शेतकऱ्यांच्या खात्यावर जोपर्यंत पैसे जमा होत नाहीत तोपर्यंत सरकारला झोपू देणार नाही - फडणवीस 

विमा कंपन्यांचे कार्यालय फोडणारे, सत्ता मिळताच गप्प का‌?‌
 
d

तेर - अतिवृष्टीमुळे उस्मानाबादसह मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नाहीत, तोपर्यंत आम्ही सरकारला झोपू देणार नाही, असा इशारा विधान सभेचे  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिला. काही वर्षांपूर्वी विमा कंपन्यांचे कार्यालय फोडणारे, सत्ता मिळताच गप्प का? असा सवालही फडणवीस यांनी शिवसेनेचे नाव न घेता उपस्थित केला.


उस्मानाबाद तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त दाऊतपूर, इर्ला, चिखली, करजखेडा,वाणेवाडी, तेर येथील गावांना भेटी देवून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर फडणवीस पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ. राणा  जगजितसिंह पाटील, आ. सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी आदी उपस्थित होते. 

sd

फडणवीस म्हणाले की, खरीप २०२० पिक विमा अजूनही शेतकऱ्यांना मिळालेला नाही, त्यात ही अतिवृष्टी... यामुळे शेतकऱ्यांचे जीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. जवळपास २५ लाख हेक्टर जमीन बाधित झालेली आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने लवकरात-लवकर मदत जाहीर करणे महत्त्वाचे आहे.

भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना अशा निसर्गनिर्मित बिकट परिस्थितीत जवळपास एका जिल्ह्याला ८०० कोटी आपण देण्याचा प्रयत्न केलेला होता. तर आजच्या स्थितीत संपूर्ण महाराष्ट्राला ८०० कोटी मिळाले नाही.

काँग्रेस सरकारच्या काळामध्ये ३००० कोटी मिळायचे ती रक्कम मोदी सरकारच्या काळात ११००० कोटी पर्यंत गेली आहे. मात्र राज्य सरकारला स्वतःच्या अंगावर काही घ्यायचं नाही, म्हणून केंद्राकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे.

शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कुजलेले पीक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेट देण्यासाठी आमच्याकडे दिले आहे. त्यांचा संदेश आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत नक्कीच पोहोचवू. आमची मुख्य मागणी हीच राहील की दसऱ्याच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हावेत. अन्यथा मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही फडणवीस यांनी दिला. 

मदत मिळेपर्यंत सरकारला झोपू देणार नाही

साहेब, आमचं सोयाबील मुसळधार पावसात कुजले, गेल्या वर्षी तर गंजी वाहत गेली तरही मदत मिळाली नाही, अव्वाच्या सव्वा वीजबिल येते. तीन वर्षांपासून प्रमुख महामार्ग रखडला, अशी व्यथा बेंबळी येथील शेतकऱ्यांनी फडणवीस यांच्यासमोर मांडली. रविवारी रात्री जोरदार पाऊस पडल्यामुळे त्यांनी बेंबळीत भेट दिली. येथील मुन्ना सत्तार शेरीकर यांच्या शेतात ते गेले. त्यावेळी शेतकऱ्यांनी तक्रारींचा अक्षरश: पाऊस पाडला. तेव्हा फडणवीस यांनी आता आम्ही ठरवलंय, शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत सरकारला झोपू देणार नाही, दसऱ्याच्या अगोदर मदत देण्यास भाग पाडू, असे आश्वासन दिले.

उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले. विमा कंपनीकडून मदत मिळत नाही. दहावी नापास मुलं विमा कंपनीने कामाला लावली. पाचशे रुपये घेऊन नुकसानीची टक्केवारी वाढवतात. सरकारचा अहवाल गृहीत धरुन विमा द्यावा. पूरग्रस्तांना मदतीस सरकार कमी पडले. सरसकट मदत करावी, अशी मागणीही फडणवीस यांनी केली. 

ठळक मुद्दे 

  •  शेती सफाईसाठी एकरी ७००० हजार रुपये खर्च शेतकऱ्यांना येतो. हा पैसा त्यांच्याकडे नाही. त्यांना कुठलीही मदत नाही. संकट फार मोठे आणि प्रचंड नुकसान आहे.
  •  आमच्या काळात एका जिल्ह्याला पीक विम्याचे ८०० कोटी रुपये मिळायचे, आता संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा तेवढे विमा मिळालेला नाही.
  •  राज्य सरकारकडून संपूर्ण दुर्लक्ष विदर्भ- मराठवाड्याकडे होते आहे.
  • दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळावी ही आमची मागणी आहे.
  • ना कुणी दौरे केले, ना कोणती मदत जाहीर झाली. अशाही परिस्थितीत वीज कनेक्शन कापले जात आहे.
  •  आमच्या वेळी विमा कंपन्या फोडणाऱ्यांना आता हा आक्रोश का दिसत नाही.
  •  आमच्या नदीचे खोलीकरण झाले, म्हणून आम्ही वाचलो, असे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.त्यामुळे ही कामे पुन्हा करा, अशी त्यांनी मागणी केली आहे.
  •  २००४ ते २०१४ या काळात राज्य सरकारने २६ हजार कोटी रुपये मागितले आणि मिळाले ३७०० कोटी.
  • २०१५ ते २०१९ या काळात मागितले २५ हजार कोटी आणि केंद्र सरकारने ११,००० कोटी रुपये दिले.

आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानी भेट 

d

पत्रकार परिषद संपल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी फडणवीस, दरेकर यांना संत गोरोबा काकांची प्रतिमा भेट देण्यात आली. 

From around the web