पीक नुकसानीपोटी ३१६ कोटी ८२ लाख २८ हजार ६५० रुपयांची शासनाकडे मागणी

३ लाख १२ हजार ४०६.५८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नासाडी
 
s

उस्मानाबाद  - अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील सोयाबीनसह ऊस, उडीद, कापूस व इतर फळपिकांना मोठा फटका बसल्याने ४ लाख ५५ हजार ४०३ शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांना शासनाने मदत करावी यासाठी जिल्हा प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांना शासनाने जाहीर केलेल्या प्रचलित दरानुसार ३ लाख १२ हजार ४०६.५८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानपोटी ३१६ कोटी ८२ लाख २८ हजार ६५० रुपये मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून देण्यात आला आहे.

जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाल्याने व पुराचे पाणी शेतात घुसल्याने शेती पिकांची प्रचंड मोठ्या प्रमाणावर हानी झाली. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने एका क्षणात हिसकावून घेत त्या पिकांचा अक्षरशः चिखल केला. त्यामुळे शेतकरी हाता सपने निसर्गाच्या प्रकोपामुळे केवळ आणि केवळ बघतच राहिला. या शेतकऱ्यांना शासनाने मदत द्यावी अशी मागणी सर्वत्र होऊ लागल्याने शासनाने पंचनामे करण्याचे आदेश देत नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून पंचनामे केले आहेत. मात्र सरकारने यासाठी किती निधी द्यायचा ? याबाबत घोषणा केली नव्हती. राज्यातील पीक नुकसानीचा संपूर्ण अहवाल प्राप्त झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर विचारविनिमय होऊन मदतीची घोषणा केली. या घोषणेनुसार जिरायत, बागायत व फळपिके असे मदतीचे वर्गीकरण करण्यात आले.
 सरकारने जिरायत क्षेत्रासाठी प्रती हेक्‍टरी १० हजार रुपये, बागायती क्षेत्रासाठी प्रती हेक्‍टरी १५ हजार रुपये व फळ पिकांसाठी प्रती हेक्‍टरी २५ हजार रुपये अशी मदत जाहीर केली.
या मदतीनुसार जिल्ह्यातील ३ लाख ५ हजार ८१२.३७  हेक्टर क्षेत्रावरील जिरायत पिकांच्या नुकसानीपोटी ३०५ कोटी ८१ लाख २३ हजार ७०० रुपये तर ५ हजार ४७५.०३ हेक्टर बागायत क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीपोटी ८ कोटी २१ लाख २५ हजार ४५० रुपये व १ हजार ११९ हेक्टर फळपिकांच्या नुकसानीपोटी २ कोटी ७९ लाख ७९ हजार ५०० रुपये मदतीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठविला आहे.


तालुकानिहाय नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची संख्या पुढील प्रमाणे - उस्मानाबाद - ८५३३६, तुळजापूर - ९५१०५, उमरगा - ५४८०८, लोहारा - ३१०१४, भूम - ५१९०७, परंडा - ३६४४२, कळंब - ६४९५० व वाशी - ३५८४७ अशी आहे.


तालुकानिहाय पेरणी लायक क्षेत्रापैकी पेरणी केलेले क्षेत्र पुढीलप्रमाणे - उस्मानाबाद -  ११४८७५ (११७८०६), तुळजापूर - १२६५०१ (१०५१२४), उमरगा - ८९८१६ (८६४६७), लोहारा - ५०३७१ (४८२१०), भूम - ७५१३२ (५९५७३), परंडा - ७८९७६ (५८६३५), कळंब - ८५६७९ (८३६४१) व वाशी - ५२८३९ (४६०८१) असे एकूण - ६७४१९० पेरणी लायक क्षेत्रापैकी (६०५५३७) एवढ्या क्षेत्रावर पेरणी केली आहे.


तालुकानिहाय जिरायत क्षेत्र हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे - उस्मानाबाद - ६८०२५.९८, तुळजापूर - ६२१९९.००, उमरगा - ३०७०२.४९, लोहारा - १९७३८.००, भूम - ३०७४५.००, परंडा - १६३५४.९०, कळंब - ५११७६.०० व वाशी - २६८७१ असे एकूण - ३०५८१२.३७ क्षेत्र आहे.


बागायत व फळपिकांचे तालुकानिहाय आकडेवारी हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे - तुळजापूर - १.१० तर फळ पिकांचे क्षेत्र ०.२० व परंडा - ५४७३.९३ व फळ पिकांचे क्षेत्र १११८.९८ असे एकूण - ५४७५.०३ व फळ पिकांचे १११९.१८ हेक्टर क्षेत्र आहे.

From around the web