आ. कैलास पाटील यांचे उपोषण तात्पुरते स्थगित

 
x

उस्मानाबाद - सन २०२० चा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तात्काळ जमा करावा, या व अन्य मागण्यासाठी ठाकरे गटाचे शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी  जिल्हाधिकाऱ्यासमोर गेल्या सहा दिवसापासून  आमरण उपोषण सुरु केले होते. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे  यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आपले उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. 


विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज उस्मानाबादेत आंदोलनस्थळी  कैलास पाटील यांची भेट घेतली व कैलास पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. अंबादास दानवे यांनी उद्धव ठाकरे यांचेही कैलास पाटलांशी फोनवरुन बोलणे करून दिले. यावेळी उद्धव ठाकरेंनी कैलास पाटलांना उपोषण मागे घेऊन आंदोलन सुरुच ठेवण्याची सूचना केली. 

उद्धव ठाकरे कैलास पाटलांना म्हणाले की, तुमचे मुद्दे, मागण्या अतिशय महत्त्वाच्या असल्या तरी तुमची तब्येतही तेवढीच महत्त्वाची आहे. त्यामुळे उपोषण मागे घेऊन शेतकऱ्यांचा हा लढा सुरूच ठेवावा. उद्धव ठाकरेंच्या या सूचनेला कैलास पाटलांनीही प्रतिसाद देत उपोषण तात्पुरते स्थगित करत असल्याची घोषणा केली.

अंबादास दानवे यांनी आता यापुढे मुंबई, पुण्यात या आंदोलनाचा दणका सुरू करू. लवकरच पुण्यात पत्रकार परिषद घेऊ. या पत्रकार परिषदेत आमदार कैलास पाटीलही आपली भूमिका मांडतील, असे सांगितले. याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज कैलास पाटलांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. 

कैलास पाटलांचा इशारा

दरम्यान, आज उपोषण स्थगित केले असले तरी आंदोलन सुरूच राहिल, असा इशारा कैलास पाटलांनी दिली आहे. उपोषण स्थगित केल्यावर कैलास पाटील म्हणाले, पीकविम्यासंदर्भात उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी उपोषणानंतर सकारात्मकतेने पावले उचलून कंपन्यांवर कारवाई केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच पिकविमा मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही येत्या एक, दोन दिवसांत मदत मिळेल, असे आश्वासन शासनाने दिले आहे. येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई न मिळाल्यास आणखी आक्रमक आंदोलन करणार.

अंबादास दानवे यांनी आज कैलास पाटलांची भेट  घेत लढाईसाठी आता वेगळा मार्ग अवलंबण्याची सूचना केली. त्यानंतर पत्रकारांशीस बोलताना दानवे यांनी शेतकऱ्यांना पीकविमा व नुकसान भरपाई न मिळाल्यावरुन राज्य सरकार व पिकविमा कंपन्यांवर जोरदार तोफ डागली.

लढाईचा वेगळा मार्ग

अंबादास दानवे म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आज कैलास पाटील यांची भेट घेत त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. लढा एकच नसतो. त्यामुळे वेगळ्या मार्गाने शेतकऱ्यांसाठी लढा सुरूच राहणार आहे. तसेच, धाराशिवमधील हा लढा आता संपूर्ण महाराष्ट्रभर पेटल्याशिवाय राहणार नाही. मात्र, सर्वप्रथम कैलास पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती त्यांना केली.

विमा कंपन्या मस्तीत

अंबादास दानवे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने विमाकंपन्यांना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तरीदेखील कंपन्या शेतकऱ्यांना जुमानत नाहीये. लोकप्रतिनिधींना जुमानत नाहीये. शेतकऱ्यांचा हक्काचा विमा देण्यास कंपन्या टाळाटाळ करत आहे. या कंपन्यांना एवढी मस्ती कोणामुळे आली आहे. ठाकरे सरकार असताना या कंपन्यांची मस्ती आम्ही जिरवली होती. आता पुन्हा त्यांची मस्ती जिरवण्याची वेळ आली आहे.

शेतकऱ्यांना पैसे मिळावेत

पुढे दानवे म्हणाले, शेतकऱ्यांना पीकविमा, नुकसान भरपाई मिळण्याबाबत केवळ सकारात्मक चर्चा करुन काही होणार नाही. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आल्याशिवाय अशा चर्चा वांझोट्या आहेत. उद्या संध्याकाळपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देण्याचे वचन सचिवांनी आम्हाला दिले आहेत. पैसे शेतकऱ्यांना मिळतील, अशी आशा आहे.

From around the web