खरीप २०२२ मधील पीक नुकसानीपोटी आणखीन रु १२ कोटी मिळणार 

- आ. राणाजगजितसिंह पाटील
 
rana

धाराशिव  - खरीप २०२२ मधील पीक नुकसानीपोटी भारतीय कृषी विमा कंपनीने आजवर रुपये ३४० कोटी वितरित केले असून नुकसानीच्या पूर्व सूचना दिलेल्या परंतु पंचनामे न केलेल्या २१४०० शेतकऱ्यांना जवळपास रुपये १२ कोटी वितरित करण्यात येणार असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

सततचा पाऊस, अतिवृष्टी व कीड प्रादुर्भावामुळे खरीप २०२२ मध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसानीच्या पूर्वसूचना देऊनही विमा कंपनीने २१४०० शेतकऱ्यांचे पंचनामे केले नव्हते, व या शेतकऱ्यांना न्याय नुकसान भरपाई दिली नव्हती. सदरील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर सातत्याने पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराला यश आले असून यापूर्वी त्या - त्या मंडळातील विमा मिळालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या सरासरी प्रमाणे या शेतकऱ्यांना विमा मंजूर करण्यात आला आहे. यापोटी अनुद्येय रक्कम जवळपास रुपये १२ कोटीचे वितरण पुढील आठवड्यात होणार आहे. 

नुकसान भरपाईतील तफावत व प्रत्यक्ष नुकसानीच्या टक्केवारीत ५०% भारांकन लावून केलेली कपात यासाठीचा पाठपुरावा सुरू असून यात  नक्कीच यश मिळेल असा विश्वास आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केला आहे. तसेच खरीप २०२० व २०२१ मधील उर्वरित पीक विम्यासाठी देखील पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

From around the web