सन २०२२ च्या पीक विम्याबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा नवा आदेश 

एक महिन्यात पंचनामे उपलब्ध करून देण्याची सूचना 
 
s

मुंबई  - खरीप 2022 मध्ये 50 % भारांकण लावून देण्यात आलेली नुकसान भरपाई नियमबाह्य असून त्या व्यतिरिक्त दिलेल्या विमा रकमेत मोठी तफावत असल्याने ऑगस्ट 2023 अखेर पर्यन्त पंचनाम्याच्या प्रती उपलब्ध करून देण्यासह नाकारलेल्या सुचनांची कारणे निहाय तपशीलवार माहिती देण्याचे आदेश कृषि मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी आज झालेल्या बैठकीमध्ये दिले आहेत. तसेच राज्य तक्रार निवारण समितीची बैठक देखील तातडीने घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

धारशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यात खरीप 2022 मधील पीक विमा वितरणा मध्ये झालेल्या अनियमितते बाबत आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या विनंती वरून आज विधानभवन मुंबई येथे कृषि व विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसामवेत बैठक आयोजित करण्यात आली होती.

खरीप 2022 मध्ये सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. या अनुषंगाने जिल्ह्यातील 589226 शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्व सूचना विमा कंपनीला दिल्या होत्या. मात्र यातील 152466 सूचना नाकारण्यात आल्या तर नुकसानीच्या क्षेत्राला नियमबाह्य पद्धतीने 50% भारांकन लावून निम्मीच नुकसान भरपाई वितरित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मिळालेल्या नुकसान भरपाई रकमेत देखील मोठी तफावत आहे. त्यामुळे याबाबत कृषि मंत्री यांच्याकडे आज बैठक आयोजित करण्यात आली होती.

नुकसान भरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांच्या रकमेत मोठी तफावत असल्याने पंचनाम्याच्या प्रती महिनाभरात उपलब्ध करून देण्याचे सक्त कृषि मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी आदेश सदरील बैठकीमध्ये विमा कंपनीला दिले आहेत. शासन परिपत्रका प्रमाणे जिल्ह्याचा पीक काढणी हंगाम 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर असून 15 ऑक्टोबर पर्यन्त 97% नुकसानीच्या सूचना प्राप्त असल्याने 50 % भारांकन लावून देण्यात आलेली नुकसान भरपाई अवैद्य असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नाकारलेल्या सुचनांची कारणे निहाय तपशीलवार माहिती देण्याचे आदेशीत केले आहे. 50 % भारांकन लावून देण्यात आलेल्या नुकसान भरपाई बाबत भारतीय कृषि विमा कंपनीच्या दिल्ली स्थित मुख्यालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय कळविण्याचे विमा कंपनीच्या उपस्थित अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.

सदरील बैठकीस आयुक्त कृषी श्री सुनील चव्हाण , कृषी सहसचिव श्रीमती सरिता बांदेकर , कृषी सहसंचालक श्री विनयकुमार आवटे, कृषी सहसंचालक लातूर विभाग श्री साहेबराव दिवेकर, मुख्य सांखिक कृषी आयुक्तालय पुणे श्री डी बी पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री रविंद्र माने, विमा कंपनीचे अधिकारी श्री. सावंत यांच्यासह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

From around the web