उस्मानाबाद जिल्ह्यात १०० 'कृषी ड्रोन सेवा केंद्र' सुरु करण्याचे उदिष्ठ... 

केंद्र सरकारचे शेतकरी उत्पादक संस्थांसह इतरांनाही भरीव अनुदान
 
s
– आ. राणाजगजितसिंह पाटील

उस्मानाबाद - आधुनिक शेतीसाठी भविष्यात ड्रोनचा वापर अनिवार्य होणार असून हि बाब लक्षात घेत, उस्मानाबाद जिल्ह्यात १०० ‘कृषी ड्रोन सेवा केंद्र’ सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवून आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने अभियांत्रिकी महाविद्यालय, उस्मानाबाद येथे दि. ८ फेब्रुवारी रोजी कार्यशाळेचे आयोजन केले असुन केंद्र सरकारने शेतकरी उत्पादक संस्थांसह इतरांनाही भरीव अनुदान जाहीर झाल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील  यांनी दिली आहे.
 
आगामी काळात कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर अनिवार्य असून पिकांवर कीटकनाशक फवारणी, मॅपिंग, दहा बँड मल्ट्री स्पेक्ट्रम कॅमेराद्वारे पिकांचे सूक्ष्म निरीक्षण व रोगांचे पूर्वानुमान, जमिनीच्या मूलभूत घटकांचे मुल्यांकन यासाठी ड्रोनचा वापर अतिशय उपयुक्त आहे. शेती व्यवसायात मनुष्यबळाचा अभाव व मर्यादा लक्षात घेता ड्रोनचा वापर हि काळाची गरज झाली आहे. हि बाब लक्षात घेवून जिल्ह्यात १०० ड्रोन ‘कृषी सेवा केंद्र’ सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवून आवश्यक मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण केंद्र चालू करण्यात येणार आहे.
 
उस्मानाबाद सारख्या आकांक्षित जिल्ह्याकडे देशाचे पंतप्रधान, नीती आयोग लक्ष देवून आहेत, त्यांची इच्छा आहे की, प्रत्येक आकांक्षित जिल्ह्यात अशा वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी व्हाव्यात जेणेकरून त्या जिल्ह्याचे नाव देश-परदेशात व्हावे व तेथे रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात व त्यामाध्यमातून विकास साधावा. या भावनेतून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे व जिल्ह्यात नाविन्यपूर्ण योजने राबविणेसाठी आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी पुढाकार घेतला आहे. देशातील ग्रामीण भागामध्ये शेतीच्या विविध अडचणी लक्षात घेवून ड्रोनचा योग्य पद्धतीने वापर करता येवू शकतो हे आता सिद्ध झालेले आहे. या अनुषंगाने आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी कृषी विद्यापीठ, टाटा सामाजिक संस्था, कृषी विभागाचे अधिकारी व काही शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या प्रतिनिधींसह प्रत्यक्ष बैठक घेतली असून जिल्ह्यातील १८० शेतकरी उत्पादक कंपनी प्रतिनिधींसोबत ऑनलाईन संवाद साधत कृषी क्षेत्रात ड्रोनचे महत्त्व व भविष्यातील फायदे याबाबत मार्गदर्शन केले आहे.  
 
 केंद्र सरकार कृषी क्षेत्रामध्ये ड्रोन च्या वापराबाबत अतिशय सकारात्मक असून नुकतेच डिसेंबर, २०२१ मध्ये याबाबतचे धोरण जाहीर करून  अर्थसंकल्पामध्ये यासाठी भरीव निधीची तरतूद केलेली आहे व लगेच  जानेवारी, २०२२ मध्ये केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञान फायदेशीर बनवण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
 
ड्रोन खरेदी करता सर्वसाधारण रु. १० लाखापर्यंत खर्च असून यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता भरीव अनुदान जाहीर केले आहे. विविध घटकांसाठी ४०% ते १००%  अनुदान दिले जाणार आहे.
 
ड्रोन वापराचे प्रशिक्षण देण्यासाठी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून सेन्सएकर, हैद्राबाद या कंपनीच्या सहकार्याने ‘सेंटर फॉर एक्सलन्स इन ड्रोन टेक्नॉलॉजीची’ स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून युवकांना ड्रोन चालविण्याच्या परवान्यासह कृषी क्षेत्रात ड्रोनच्या संपूर्ण वापराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ड्रोन तंत्रज्ञान व प्रशिक्षणाबद्दल अधिक माहिती देण्यासाठी ८ तारखेला सेन्सएकर, हैद्राबाद चे तज्ञ तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय येथे उपस्थित असणार आहेत. इच्छुक शेतकरी, शेतकरी उत्पादक गट/ कंपनी यांनी ड्रोन कृषी सेवा केंद्राचा प्रस्ताव, प्रशिक्षण याबाबतच्या इंतभुत माहितीसाठी व पुढील कार्यपद्धती समजून घेण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालय, उस्मानाबाद येथे दि. ०८.०२.२०२२ रोजी भेट द्यावी तसेच श्री. किरण आवटे (९८५०५०९९२०) यांच्याकडे नोंदणी करावी असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

From around the web