पूर्वसूचना देवूनही पंचनामा न केलेल्या पिकांची भरपाई महसूल मंडळातील नुकसानीच्या सरासरीनुसार द्यावी - जिल्हाधिकारी
उस्मानाबाद - शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिल्यानंतरही पीक विमा कंपनीने नुकसानीचे पंचनामे केले नसल्यास, सदर महसूल मंडळात त्या काळात झालेल्या पीक नुकसानीच्या सरासरीनुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
खरीप हंगामात अतिवृष्टी, सततचा पाऊस, क्षेत्र जलमय होणे, किड व रोगाचा प्रादुर्भाव, पावसातील खंड आदी बाबींमुळे अधिसुचित पिकांचे नुकसान झालेले असल्याने स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान भरपाई अंतर्गत 5 लाख 88 हजार 574 शेतकऱ्यांनी पुर्वसूचना दिलेल्या होत्या. त्यापैकी एक लाख 51 हजार 477 पुर्वसूचना उशिराने दिल्यामुळे, नुकसानीचे कारण चुकीचे नमूद केल्यामुळे आणि इतर कारणांमुळे विमा कंपनीने नाकारलेल्या आहेत.
शासनाच्या पीक कॅलेंडरनुसार पिकाचा सर्वसाधारण काढणी कालावधीचा विचार केला असता मोठ्या प्रमाणात पुर्वसूचना काढणी कालवधीच्या 15 दिवसांपूर्वी प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे मार्गदर्शक सुचनेनुसार 50:50 भारांकन लावून निश्चित केलेली नुकसान भरपाई जिल्हास्तरीय समितीस मान्य नसल्याने सुधारित नुकसान भरपाई निश्चिती करून त्यानुसार वाटप कराव्यात. तसेच पंचनाम्याच्या प्रती तालुका कृषि अधिकारी कार्यालयास उपलब्ध करुन द्याव्यात. पंचनाम्यानुसार नुकसानीची परिगणा करून सुधारित नुकसान भरपाईची यादी उपलब्ध करुन देण्याच्या सूचना विमा कंपनीला यापूर्वी झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत दिल्या होत्या. एक महिन्याचा कालावधी उलटूनही विमा कंपनीने पंचनाम्याच्या प्रती उपलब्ध करून दिल्या नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
विमा कंपनीने पंचनाम्याच्या प्रती सात दिवसांत तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे सादर कराव्यात. तसेच जिल्ह्यातील विमा हप्ता, प्राप्त झालेली रक्कम आणि त्यानुसार वाटप होणारी रक्कम याबाबतची माहिती दोन दिवसांत सादर करावी. पुर्वसूचना दिलेल्या ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नाहीत, अशा शेतकऱ्यांना त्या कालावधीतील त्या महसूल मंडळतील नुकसानीची सरासरी काढून त्याप्रमाणे विमा भरपाई तात्काळ वितरीत करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांनी यावेळी दिले.
शेतकऱ्यांनी दिलेल्या पूर्वसूचना विमा कंपनीने अपात्र केलेल्या आहेत. शासन निर्णयानुसार विमा कंपनीने पूर्वसूचना प्राप्त झाल्यापासून 48 तासांच्या आत नुकसानीचे मुल्यांकन निश्चित करण्यासाठी पात्रतेच्या पर्यवेक्षकांची नियुक्ती करुन दहा दिवसांत नुकसानीचा अहवाल तयार करणे आवश्यक आहे. त्यामुळे पुर्वसूचनांची विहीत मुदतीत पाहणी केलेली नसल्यामुळे अपात्र ठरविलेल्या पुर्वसूचना पात्र करून त्या शेतकऱ्यांनाही संबंधित मंडळाच्या नुकसानीच्या सरासरी एवढी नुकसान भरपाई विमा कंपनीने वितरीत करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांनी दिले.