तावरजखेडा  : बियाणे न उगवल्यामुळे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

बियाणे न उगवल्याच्या जिल्ह्यात सहा तक्रारी
 
news

उस्मानाबाद -  बियाणे न उगवल्याच्या जिल्ह्यातील सहा तक्रारी जिल्हा कृषी कार्यालयात धडकल्या आहेत. तावरजखेडा (ता. उस्मानाबाद) येथील शेतकऱ्यानेही बियाणे न उगवल्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे आता प्रशासनाने या तक्रारींचा तातडीने योग्य निपटारा करण्याची तसेच शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

तावरजखेडा येथील संजय शामराव फेरे (४६) यांनी सोमवारी पहाटे आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांनी एक हेक्टर १६ गुंठ्यात सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र, बियाणे न उगवल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. त्यांनी घरगुती सोयाबीनचे बियाणे पेरलेले हाेते. यामुळे त्यांना शासकीयस्तरावर तक्रार करता येणार नव्हती. मात्र, नुकसान तर झाले हाेते. या कात्रित ते सापडल्यामुळे त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. आता जिल्ह्यात सहा ठिकाणी अशा तक्रारी कृषी कार्यालयात आल्या आहेत. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील दोन व उमरगा तालुक्यातील चार तक्रारींचा समावेश आहे. 


कंपनीचे बियाणे नसल्याने अडचणी

जिल्ह्यात महाबीज किंवा नोंदणीकृत कंपन्या सोयाबीनचे बियाणे मुबलक प्रमाणात पुरवण्यात अपयशी ठरल्या आहेत. यामुळे झालेल्या २५ टक्के पेरणीमध्ये अनेक शेतकऱ्यांनी घरगुती बियाणांचा वापर केला आहे. हे बियाणे उगवले नाही तर याची तक्रार करता येत नाही. यामुळे भरपाई मिळू शकत नाही. मात्र,शेतकऱ्यांनी खत, पेरणी, मशागत आदीसाठी मोठा खर्च केलेला असतो. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. यामुळे यासाठी दिलासा देण्याची तरतुद करणे आवश्यक आहे


गतवर्षी पाच हजार तक्रारी

या अगोदरच्या खरीप हंगामात सोयाबीन न उगवल्याच्या पाच हजारांपेक्षा अधिक तक्रारी आल्या होत्या. त्यावेळी शेतकऱ्यांना विशेष दिलासा मिळाला नाही. केवळ बियाणांचेच वाटप करण्यात आले तर काही ठिकाणी बियाणांच्या किंमतीऐवढी रक्कम देण्यात आली होती. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरून आले नाही. यामुळे नियमात बदल करून शेतकऱ्यांना पूर्ण खर्च मिळण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे.

बनावटवर हवे नियंत्रण
सध्या महाबीज व प्रथितयश कंपन्यांचे बियाणे जिल्ह्यात उपलब्ध नाही. यामुळे अनेक दुकानदार नफेखोरीसाठी कधीही नाव न ऐकलेल्या कंपनीने बनावट बियाणे विक्री करू शकतात. शेतकरीही पर्याय नसल्यामुळे हे बियाणे खरेदी करतात. यामुळे अशा बियाणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी दुकानदारांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. सध्या कारवाया ठंड पडल्या आहेत.
 

From around the web