विमा कंपनी कडून पंचनामे उपलब्ध करून देण्यास सुरुवात

पहिल्या टप्यात ५०००  पंचनामे कृषी विभागाकडे उपलब्ध
 
pik vima

उस्मानाबाद - खरीप २०२२ मधील पिकांच्या झालेल्या नुकसानीचे विमा कंपनीकडून करण्यात आलेले पंचनामे कृषी विभागाकडे सुपूर्द करण्यास सुरुवात झाली असून आज पहिल्या टप्यात तुळजापूर व लोहारा तालुक्यातील अनुक्रमे २००० व ३००० पंचनामे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे उपलब्ध झाले आहेत.

सदर पीक विम्याबाबत झालेल्या अनियमितता व त्रुटी जाणून घेण्याच्या अनुषंगाने आवश्यक पंचनाम्याच्या प्रती उपलब्ध करून देण्याची मागणी भारतीय कृषी विमा कंपनीचे महाव्यवस्थापक तथा सहसचिव श्री.सिद्धेश रामसुब्रमण्यम यांच्याकडे करण्यात आली होती. या अनुषंगाने १० जानेवारी पर्यंत पंचनामे उपलब्ध करून देण्याचे त्यांनी मान्य केले होते. मात्र दोन दिवस उशिराने आज पहिल्या टप्यात ५००० पंचनामे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे सुपुर्द करण्यात आल्याचे विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आ.राणाजगजितसिंह पाटील यांना अवगत केले आहे. तसेच उर्वरीत सर्व पंचनाम्याच्या प्रती आठवडाभरात उपलब्ध करून देण्याचे मान्य केले आहे.

अतिवृष्टी, सततचा पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पूर्वसूचना देऊन देखील जिल्ह्यातील जवळपास १.५ लाख शेतकरी विम्यापासून वंचित आहेत. अनेकांना अत्यल्प नुकसान भरपाई देण्यात आली आहे, तर भरपाई दिलेल्या सर्वांनाच नियमबाह्य पद्धतीने ५० टक्के भारांकण लावून निम्मीच नुकसान भरपाई वितरित केली आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानीचे पंचनामे उपलब्ध करून देण्याची मागणी विमा कंपनी कडे करण्यात आली होती.

नुकसान भरपाई रकमेतील तफावत दूर करणे व वंचित शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पंचनाम्याच्या प्रती उपलब्ध होणे आवश्यक होते. आता पंचनाम्याच्या प्रती उपलब्ध होत असून नेमके कोणत्या कारणावरून विमा नाकारला आहे तसेच नुकसान भरपाईमध्ये मोठी तफावत नेमकी कशामुळे आली आहे, या बाबी स्पष्ट होणार आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसान भरपाई मिळवून देईपर्यंत आपण स्वस्थ बसणार नसून यासाठी आग्रही पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी आश्वासित केले आहे.

From around the web