उस्मानाबाद जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50 हजार द्या

राष्ट्रवादीचे संजय पाटील दुधगावकर यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
 
dudhgavkar

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा ओला दुष्काळी जाहीर करावा व जिल्ह्यातील शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शनिवारी (दि.22) केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात दुधगावकर यांनी म्हटले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यात खरिपातील सोयाबीन हे पीक लावलेल्या दिवसापासून अडचणीत आले आहे. जुलै ते ऑक्टोबर या महिन्यापर्यंत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे सोयाबीन या मुख्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुरुवातीला पावसामुळे नंतर गोगलगायीमुळे नंतर येलो मोझॉक, खोड आळी, चक्रीभुंगा व तांबेरा रोगाच्या प्रादुर्भावामुळे 50 टक्केपेक्षा जास्त शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. 

जिल्ह्यामध्ये चार लाख 54 हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. परंतु परतीच्या पावसाने उस्मानाबाद जिल्ह्यात कहर केला असून पीक काढणीच्या वेळेस मोठा पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या डोळ्यासमोर पीक वाया गेले व वाहून गेले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या सोयाबीनचे शंभर टक्के झालेले नुकसान पाहता राज्य सरकारने उस्मानाबाद जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहू नये, जिल्ह्यातील शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील तर ओला दुष्काळ जाहीर करावा व हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात संजय पाटील दुधगावकर यांनी केली आहे.
 

From around the web