उस्मानाबाद : खरीप पिक विमा २०२० च्या नविन याद्या ३ दिवसात...
उस्मानाबाद - विमा कंपनीने दिलेल्या खरीप 2020 पिक विमा नुकसान भरपाईच्या याद्या कृषी विभागामार्फत धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील प्रत्येक गावात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या याद्या अपूर्ण असल्यामुळे मान्य करता येणार नाहीत व कारण नसतांना शेतकऱ्यांची हेळसांड होत आहे. या अनुषंगाने आ. राणाजगजितसिंह पाटील यांची जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा झाली व आज दि.१८.१०.२०२२ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पिक विमा कंपनीचे अधिकारी, महसुल, कृषी विभागाचे अधिकारी व पीक विमा याचिकाकर्ते यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.
आम्ही केलेल्या याचिकेतील मागणीच्या अनुषंगाने उच्च व सर्वोच्च न्यायालयात झालेल्या निर्णया प्रमाणे जिल्हाधिकारी यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना ३,५७,२८७ शेतकऱ्यांची यादी प्रति हेक्टर रू. १८,००० (सरंक्षीत रक्कमेच्या ४० टक्के प्रमाणे) तीन दिवसात द्यावी अशे आदेश दिले. बजाज अलायन्झ इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांची यादी तीन दिवसात न दिल्यास कंपनी विरोधात भारतीय दंड संहिता कलम १८८ प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल अशी सक्त ताकीद दिली.
सन २०२० खरिप मध्ये ३,५७,२८७ शेतकऱ्यांचे २,९५,२३८ हेक्टर क्षेत्र बाधीत झाले होते. रु. १८,००० प्रति हेक्टर प्रमाणे जिल्हयातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम हि रु.५३१.४२ कोटी मिळणे अपेक्षित आहे. विमा कंपनीने जाणीवपुर्वक शेतकऱ्यांच्या हक्काची रक्कम गेल्या २२ महिन्यांपासून न दिल्याने १२ % प्रति वर्षा प्रमाणे रु.११६ कोटी हि व्याजाची रक्कम नियमा प्रमाणे देण्याची मागणी या बैठकीत आम्ही याचिकाकर्ते व भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. जिल्हाधिकारी यांच्याकडून आम्ही केलेल्या मागणीची मीनीट बुक (प्रोसेडिंग) मध्ये नोंद घेण्यात आली व याबाबत कंपनीला आदेशित केले. आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या हक्काची रक्कम दिवाळी पुर्वी मिळवण्याचे आमचे प्रयत्न आहेत.या बैठकीस भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय विठ्ठलराव पाटील, याचिकाकर्ते राजकुमार पाटील व प्रशांत लोमटे आदी उपस्थित होते.