पिक विम्यामध्ये कांदा पिकाचा समावेश करावा अन्यथा आंदोलन
धाराशिव : पिक विम्यामध्ये कांदा पिकाचा समावेश करावा, या मागणीचे निवेदन आमदार कैलास दादा पाटील यांचा मार्गदर्शनाखाली युवा सेनेच्या वतीने जिल्हा कृषी अधिकारी व अॕग्रीकल्चर इनश्युरन्स कंपनीला देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात 17 हजार 795 हेक्टर व रब्बी हंगामात 22 हजार 561 हेक्टर व उन्हाळी एक हजार 424 हेक्टरमध्ये कांदा पिकाची लागवड झाली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी कांदा लागवड करतो, पण पीक विमा भरताना त्याला पीक विमा कंपनीच्या ऑनलाइन साईटवर कांदा या पिकाची निवड करता येत नाही. त्यामुळे हजारो शेतकरी कांदा पिकाच्या विम्यापासून वंचित राहतात. त्यामुळे पिक विम्यामध्ये कांदा पिकाचा समावेश करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
आमदार कैलास दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेनेचे उपतालुका प्रमूख राकेश सूर्यवंशी, तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष पांडुरंग माने, विभाग प्रमुख ओंकार आगळे, सोशल मीडिया तालुका समन्वयक रुपेश शेटे, गजानन पडवळ, गणेश कदम, अक्षय सूर्यवंशी, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, शकील शेख यांनी हे निवेदन दिले.जर कांदा या पिकाचा पीकविमा मध्ये समावेश नाही केला तर शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.