आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना ओएनजीसी तर्फे गायींचे वाटप होणार

 
sd

उस्मानाबाद  -  मुंबई येथील ओएनजीसीतर्फे सीएसआर (सामुदायिक सामाजिक जबाबदारी) उपक्रमांतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील आठ तहसील मधील 93 आत्महत्याग्रस्त कुटुंबांना दुधाळ जनावरे (मिश्र जातीच्या गायी) पुरविण्यासाठी एकूण सात प्रकल्प हाती घेतले आहेत. यामध्ये उस्मानाबाद 13, उमरगा 11,कळंब 13, भूम 11, परंडा 11, तुळजापूर 12, आणि लोहारा 11 लाभार्थ्यांना प्रकल्पांचे लाभ मिळणार आहे. एकूण 186 गायी 93 कुटुंबांना देण्यात येथील त्यावर एक कोटी 23 लाख 88 हजार 902 रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

हा प्रकल्प उस्मानाबाद येथील जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन, विभागाच्यामार्फत आणि जिल्हाधिकारी कार्यालय  यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. उस्मानाबाद हे नीति आयोगाने निवडलेल्या आकांक्षी जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. सीएसआर उपक्रमांच्या माध्यमातून विकासकामे करण्याची जबाबदारी ओएनजीसीकडे देण्यात आली आहे.

आत्महत्याग्रस्त कुटुंबांना दुग्ध व्यवसाय करण्यास प्रोत्साहित करणे,आत्महत्याग्रस्त कुटुंबांना शाश्वत उपजीविका आणि उत्पन्नाचे स्त्रोत प्रदान करणे. पशुधन क्षेत्राची शाश्वत वाढ आणि विकास प्रदान करणे.दुभत्या जनावरांची खरेदी जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन, उस्मानाबाद यांच्यामार्फत केली जाणार आहे.

जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन, उस्मानाबाद यांच्यामार्फत 4 ते 6 वर्षे वयोगटातील दुधाळ जनावरांची खरेदी केली जाईल आणि गाईच्या कानात इलेक्ट्रॉनिक चिप घातली जाईल आणि गाईचा मालक, पत्ता इत्यादी तपशील टॅग केले जातील. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयात माहिती सहज उपलब्ध होईल. खनिज मिश्रण आणि दुधाचा शिधा यासाठीचा प्रारंभिक खर्च कुटुंबांना महिनाभरासाठी देण्यात आला आहे. जेणेकरून ते या कालावधीत पैसे कमवू शकतील आणि त्यानंतरचा वारंवार येणारे खर्च उचलू शकतील.

प्रत्येक कुटुंबाला दोन जनावरे आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या पत्नीला दिली जातील. पत्नीच्या अनुपस्थितीत (मृत्यू/अविवाहित/घटस्फोटित झाल्यामुळे) कुटुंबातील महिला सदस्यांना फायदे दिले जातील. कुटुंबातील पत्नी/मुलगी/आई/कोणत्याही महिला सदस्याच्या अनुपस्थितीत, कुटुंबातील पुरुष सदस्याला लाभ दिला जाईल.लाभार्थ्याने लाभ नाकारल्यास, ते संबंधित तालुक्यांच्या यादृच्छिक निवड आदेशाच्या (Random Selection Order) यादीनुसार पुढील प्रतीक्षेच्या यादीत असलेल्या लाभार्थ्यांना दिले जातील.

From around the web