खरीप २०२२ पीक विम्याबाबत विभागीय तक्रार निवारण समितीची बैठक घ्या... 

विभागीय आयुक्तांकडे आ. राणाजगजितसिंह पाटील यांची मागणी
 
rana

उस्मानाबाद - जिल्हा तक्रार निवारण समितीच्या आदेशाचे विमा कंपनीकडून पालन होत नसल्याने विभागीय तक्रार निवारण समितीची बैठक घेऊन धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप २०२२ चा अनुज्ञेय पिक विमा प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या टक्केवारीप्रमाणे वितरित करण्यासह पंचनाम्याच्या प्रती तात्काळ उपलब्ध करून देण्याचे व नुकसानीच्या पूर्वसूचना देवूनही वि्मा नाकारलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा वितरित करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी विभागीय आयुक्त तथा विभागीय तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष यांना केली आहे.

सततचा पाऊस, अतिवृष्टी व कीड रोगांचा प्रादुर्भाव यामुळे खरीप २०२२ मध्ये धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत जिल्ह्यातील ५ लाख ४९ हजार १६ शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना विमा कंपनीकडे केल्या होत्या, परंतु विमा कंपनीने यातील केवळ २ लाख ८१ हजार ५८२ शेतकऱ्यांनाच रुपये २५४.९३ कोटी वाटप केले असून उर्वरित जवळपास दीड लाख शेतकरी वंचित आहेत, तर अनेकांना अत्यल्प नुकसान भरपाई देण्यात आली आहे. नुकसान भरपाई रकमेतील मोठी तफावत व वंचित शेतकऱ्यांच्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना जिल्हा तक्रार निवारण समितीची बैठक घेण्याचे सूचित केले होते. सदरील बैठकीत शेतकऱ्यांना नुकसानीच्या टक्केवारीत नियमबाह्य ५० % कपात करून विमा वितरित केल्याचे स्पष्ट झाले होते. या अनुषंगाने भारतीय कृषी विमा कंपनीच्या विभागीय व्यवस्थापक श्रीमती शकुंतला शेट्टी यांच्याशी बैठकी दरम्यान दूरध्वनीद्वारे चर्चा झाली होती व त्यांनी पंचनामाच्या प्रती एक आठवड्याच्या आत उपलब्ध करून देण्याचे मान्य केले होते, तसेच झालेल्या चुका दुरुस्त करण्याचे देखील आ. राणाजगजितसिंह पाटील यांना आश्वासित केले होते.

 पीक विमा वितरणातील या सर्व बाबी स्पष्ट झाल्यानंतर जिल्हा तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी ५०:५० भारांकण लावून निश्चित केलेली नुकसान भरपाई जिल्हास्तरीय समितीस मान्य नसून सुधारित नुकसान भरपाई निश्चित करून त्यानुसार वाटप करण्याचे तसेच विमा कंपनी कडील पंचनामाच्या प्रती तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करण्याचे आदेश दिले होते. नुकसानीच्या पूर्व सूचना दिलेल्या ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नाहीत, अशा शेतकऱ्यांना त्या कालावधीतील त्या महसूल मंडळातील नुकसानीची सरासरी काढून त्याप्रमाणे विमा भरपाई तात्काळ वितरित करण्याचे देखील आदेशित केले होते.मात्र विमा कंपनीकडून जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन होत नसून वेळकाढूपणा होत आहे.

त्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील तरतुदी प्रमाणे विभागीय तक्रार निवारण समितीची बैठक घेऊन धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप २०२२ चा अनुज्ञेय पिक विमा प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या टक्केवारीप्रमाणे वितरित करण्यासह पंचनाम्याच्या प्रती तात्काळ उपलब्ध करून देण्याचे व पूर्वसूचना नाकारलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा वितरित करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी विभागीय आयुक्त तथा विभागीय तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष यांना करण्यात आली आहे.

From around the web