सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी अनुदान मंजूर
उस्मानाबाद - नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित आपदग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये सततच्या पावसाने बाधित पण ६५ मि.मी. च्या निकषात न बसणाऱ्या राज्यातील आणखी ६ लाख शेतकऱ्यांना रु. ७५५ कोटींची मदत मंजूर करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे जिल्हयातील १ लाख १३ हजार हेक्टर क्षेत्राच्या नुकसानीपोटी १ लाख ४७ हजार ८२७ शेतकऱ्यांना रु.१५४ कोटी अनुदान मिळणे अपेक्षित आहे. या नंतर देखील सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या नुकसानीची माहिती शासनाकडे पाठविण्यात येत असुन यापोटी देखील अनुदान मिळणार आहे. यामध्ये जिल्हयातील जवळपास सर्व मंडळांचा समावेश आहे. जिल्हयातील ७५७३९ शेतकऱ्यांना यापुर्वीच रु.९०.७४ कोटी रुपये मंजुर करण्यात आलेले असुन त्याचे वितरण सुरु आहे.
जिल्हासह राज्यातील अनेक ठिकाणी सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले होते. या पुर्वी केवळ अतिवृष्टीने म्हणजेच २४ तासात ६५ मि.मि. पेक्षा जास्त पाऊस झाल्यासच आपत्ती निवारण निकषा प्रमाणे मदत दिली जात होती, मात्र युती सरकारने विशेष बाब म्हणुन सततच्या पावसामुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी आपत्तीग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय आजच्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. विरोधकांकडुन जिल्हा अनुदानातुन वगळला अशा अफवा पसरविल्या जात होत्या. ऐन सणासुदीच्या काळात मदत जाहिर करुन शासनाने बळीराजाला मोठा दिलासा दिला आहे.
सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीपोटी विशेष बाब म्हणुन अनुदान मिळावे यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु होता. याबाबत आज मंत्रीमंडळ उप समितीची बैठक घेण्यात आली होती. यामध्ये सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना अनुदान जाहिर करण्यात आले आहे.सदरील बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ग्रावविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित होते.
सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीपोटी यापुर्वी कधीही शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले नव्हते. बळीराजाच्या हिताच्या सरकारने हा अभुतपुर्व निर्णय घेतला आहे. त्याबद्दल राज्यातील शेतकऱ्यांच्या वतीने शिंदे-फडणवीस सरकारचे आभार आ. .राणाजगजिसिंह पाटील यांनी मानले आहेत.