शेतक-यांनो पेरणीची घाई नको, दुबार पेरणीचे संकट टाळा

 
farmer

उस्मानाबाद- गतवर्षी मृग नक्षत्रात बहुतांश शेतकरी खरीप पेरणी करून निश्चिंत झाले होते. परंतु यंदा हे नक्षत्र सरण्यास अवघे काही दिवस उरले असतानाही जिह्यात सर्वदूर पाऊस झालेला नाही. काही भागांत थोड्याबहुत सरी कोसळल्या आहेत. अशा अत्यल्प पावसावर शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ धरू नये. विशेषत: सोयाबीन पेरणीसाठी किमान ७५ ते १०० मिमी पाऊस होण्याची प्रतीक्षा करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. 

यंदाही वेळेवर पाऊस पडेल, असे भाकीत हवामान खात्याकडून करण्यात आले होते. परंतु, मृग नक्षत्र - सरण्यास काही दिवस उरले असतानाही पेरणीपूरक पाऊस झालेला नाही. त्यामुळे खत, बियाणे खरेदी करून ठेवलेले शेतकरी चिंतित आहेत. जिल्ह्याच्या काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. पुढे दमदार पाऊस होईल, या आशेवर काही  शेतकरी पेरते झाले आहेत. सोयाबीन पेरणीसाठी किमान ७५ ते १०० मिमी पाऊस व्हायला हवा. यापेक्षा कमी पावसावर पेरणी उरकल्यास बियाणे वाया जाण्याची दाट शक्यता असते, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.  

तर बियाण्यांची होणार बचत

सोयाबीन पेरणीपूर्वी बियाणाची उगवण क्षमता तपासावी.  उगवणक्षमता ७० टक्क्यांपेक्षा कमी आल्यास अधिकचे बियाणे पेरणीसाठी उपयोगात आणावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एम.डि तिर्थकर यांनी केले आहे. पारंपरिक पद्धतीने सोयाबीनची पेरणी केल्यास हेक्टरी किमान ७५ किलो बियाणे लागते. मात्र, पेरणीसाठी टोकण अथवा प्लॅटर पद्धतीचा अवलंब केल्यास केवळ ५० ते ५५ किलो बियाणे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी या पद्धतीची कास धरावी, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. 

पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी. रायझोबियम आणि पीएसबी जीवाणू संवर्धकाची प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम प्रति १० ते १५ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे. यानंतर त्याची पेरणी करावी. बियाण्याची पेरणी ३ ते ४ सेंटीमीटर खोलीपर्यंत करावी.

या अधिच खरीपातील अतिवृष्टीच्या तडाख्याने प्रचंड नुकसान होऊन हातातोंडाशी आलेली पिके हिरावली गेली आहेत. बोगस बियाणे, दुबार-तिबार पेरणी,  त्यात खरीपातील पिक विमा पण न मिळाल्यामुळे आर्थिक चिंता अशा एक ना अनेक परिस्थितीत आपण आतापर्यंत धीराने तोंड दिले आहे, पण शेवटी आताच्या परिस्थितीत त्यातून आलेली हतबलता यामुळे बेचैन होणे साहजिकच आहे, पण तरीही कृपया मायबापानो कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नका किंवा विचार करू नका, हीसुद्धा वेळ निघून जाईल, आम्ही तुमच्या सोबत आहोत.कोणतीही अडचण असो, आपण त्यातून नक्की मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, पण हार मानू नका. फोन आल्यानंतर योग्य यंत्रणेशी जोडून देऊन मार्गदर्शन करून सल्ला, मार्गदर्शन देऊन, त्रस्त शेतकरयांना समुपदेशन करून मानसिक आधार देण्यात येईल त्यातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत झालेली आहे.फक्त शिवार हेल्पलाइनला ८९५५७७१११५ एक फोन करा, असे आवाहन शिवार फाऊंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांनी केले आहे.

यासाठी मारिवाला हेल्थ इनिशिएटिव्ह, तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद, कृषी महाविद्यालय, गडपाटी, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, कृषी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना या शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी अशा सर्वच संस्थाचे सहकार्य मिळत आहे.

From around the web