तेरणा साखर कारखाना सुरू करण्याच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर

ढोकी येथे जोरदार रास्ता रोको आंदोलन; बार्शी-लातूर मार्गावर वाहतूक ठप्प
 
s
कारखाना सुरू न केल्यास डीसीसी बँकेविरोधात उग्र आंदोलन करण्याचा इशारा

उस्मानाबाद -तालुक्यातील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यास डीसीसी बँकेकडून दिरंगाई केली जात असल्याच्या निषेधार्थ ढोकी येथील चौकामध्ये  आज शेतकर्‍यांनी जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. डीसीसी बँकेविरोधात घोषणा देत रस्ता अडवून धरल्यामुळे लातूर-बार्शी मार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती.

मराठवाड्यातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना अशी ओळख असलेल्या ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची गेल्या बारा वर्षापासून परवड सुरू आहे. कर्जाच्या खाईत बुडालेल्या या कारखान्याला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी हा कारखाना भाडेततत्त्वावर देण्याचा निर्णय डीसीसी बँकेने घेतलेला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. परंतु राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे भैरवनाथ शुगर आणि माजी मंत्री अमित देशमुख यांच्या ट्वेन्टीवन शुगर्स या दोघांच्या निविदांवरुन वाद निर्माण झाला. 

या वादावर न्यायालयाने निकाल दिल्यानंतर चालू हंगामात हा कारखाना सुरू होईल अशी अपेक्षा तेरणा साखर कारखान्याचे कामगार, सभासद शेतकर्‍यांना होती. मात्र अद्याप कोणत्याच हालचाली दिसत नसल्यामुळे तेरणा बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वात शेतकर्‍यांनी ढोकी येथे जोरदार रास्ता रोको आंदोलन करुन कारखाना सुरू करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधून घेतले.

यावेळी तेरणा बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांनी डीसीसी बँकेच्या कारभाराविरोधात तीव्र रोष व्यक्त केला. कारखाना तात्काळ सुरू न केल्यास डीसीसी बँकेच्या विरोधात उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा संघर्ष समितीने दिला आहे.

आंदोलनात तेरणा बचाव संघर्ष समितीचे संग्राम देशमुख, गफार काझी, निहाल काझी, अमोल समुद्रे, राहुल वाकुरे, सतीश देशमुख, गुणवंत देशमुख, तानाजी जमाले, सतीश वाकुरे, विलास रसाळ, डी.एम.पाटील, बारीसाहेब काझी यांच्यासह तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे सभासद शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
 

From around the web