ई-पीक पाहणी न करताही काढता येणार पीकविमा

स्वयंघोषणा पत्राद्वारे शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी होता येईल सहभागी
 
pik vema

उस्मानाबाद -  पीकविमा योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पीक पाहणीची नोंद आवश्यक नाही. अगोदर कृषी आयुक्तांनी ई-पीक पाहणीच्या नोंदीची आवश्यकता असल्याचे आदेश काढले होते. यात पुन्हा बदल करण्यात आला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी संभ्रमात न राहता ३१ जुलैपूर्वी पीकविमा काढावा, असे आवाहन  जिल्हा कृषी अधिकारी महेश तिर्थकर यांनी  केले आहे.

राज्यात सन २०२२-२३ आर्थिक वर्षात ‘प्रधानमंत्री पीक विमा’ योजना राबवण्यात येत आहे. खरीप २०२२ मध्ये या योजनेत भाग घेण्याचा अंतिम दि. ३१ जुलै २०२२ आहे. तर शासनाच्या ‘ई-पीक पाहणी’मध्ये पीक पेरण्याची नोंद घेण्याची कार्यवाही दि. १ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होते. नुकसान भरपाई देताना शेतकऱ्यांनी शेतात घेतलेले पीक आणि विमा हप्ता भरताना नोंदवलेले पिकात तफावत आढळल्यास सदर शेतकऱ्याने पीक पाहणी मध्ये केलेली नोंद ही अंतिम गृहीत धरण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे पीक विमा योजनेत सहभाग घेताना ‘ई-पीक पाहणी’मध्ये पिकाची नोंद असलेला दाखला असण्याची आवश्यकता नाही.

 सदर शेतकरी पीक विम्याबाबत स्वयंघोषणा पत्राद्वारे पीकविमा योजनेत सहभाग घेऊ शकतो. मात्र १ ऑगस्ट २०२२ नंतर त्यांनी ‘ई-पीक पाहणी’मध्ये आपल्या पिकांची नोंद करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


लगेच ई-पीक पाहणीची आवश्यकता नाही
पिक विमा काढताना लगेच ई-पीक पाहणीची आवश्यकता नाही. सद्या घोषणापत्र असले तरी चालेल. मात्र, १५ ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करणे आवश्यक राहणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी तत्काळ पीकविमा काढून घ्यावा असे आवाहन  जिल्हा कृषी अधिकारी  महेश तिर्थकर यांनी  केले आहे.

दोन लाख शेतकऱ्यांनी भरला विमा

जिल्ह्यात चार लाख नऊ हजार लाभार्थी आहेत. त्यापैकी आता पर्यंत दोन लाख शेतकऱ्यांनी हा विमा भरला आहे. काही शेतकऱ्यांचे एका पेक्षा जास्त शेत असल्याने त्यांच्या एक पेक्षा अधिक नोंदी होऊ शकतात. त्यामुळे गेल्यावर्षी सहा लाख ६० हजार विमा नोंदी घेण्यात आल्या होत्या.
 

From around the web