पक्कया पावतीशिवाय बियाणे, खते  खरेदी करू नका

जिल्हा अधिक्षक कृषि अधिका-यांचे शेतक-यांना आवाहन
 
d

 उस्मानाबाद -  कृषि निविष्ठा सनियंत्रणासाठी जिल्हा  व तालुकास्तरावर भरारी पथकाची स्थापना केलेली असून त्याद्वारे सनियंत्रण करण्यात येत आहे. याअनुषंगाने कृषि सेवा केंद्राची तपासणी करण्यात येत आहे. जिल्हातील कृषि सेवा केंद्रधारकांचे हंगामपुर्व प्रशिक्षण घेण्यात आलेले आहेत. शेतक-यांना एम.आर.पी पेक्षा जास्त दराने खत विक्री न करणे, लिंकींग न करणे, सोयाबीन बियाणे साठवणूक व विक्री करताना काळजी घेणे तसेच बियाणे,खते व किटकनाशके कायद्याचे पालन करुन सर्व कृषि निविष्ठा केंद्र किंवा वितरकांनी चांगल्या दर्जाच्या कृषि निविष्ठा पूरवण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

           शेतक-यांनी बियाणे, खते, किटकनाशके खरेदी करत असताना अधिकृत परवानाधारक कृषि सेवा केंद्रातूनच कृषि निविष्ठांची खरेदी करावी, खरेदी करताना पक्की पावती घ्यावी पावतीवर खरेदी केलेल्या निविष्ठाचा संपूर्ण तपशील, विक्रेत्याची स्वाक्षरी असल्याची खात्री करावी.अनुदानित रायासनिक खताची खरेदी केल्यावर विक्रेत्याकडून ई-पॉस मशीनवरील बिल घ्यावे व खरेदी केल्यानंतर खताच्या बॅगवरील किंमत व विक्रेत्याने दिलेले बिल तपासून घ्यावे तसेच बियाणे खरेदी केल्यानंतर त्याचे टॅग, वेस्टन, पिशवी व त्यातील  थोडे बियाणे हंगाम संपेपर्यंत जतन करुन ठेवावेत. बियाण्यांची पिशवी सिलबंद असल्याची खात्री करावी व त्यावरील अंतिम मुदत पाहून घ्यावी. नामांकित कंपनीचे बियाणे, खते, किटकनाशके खरेदी करावीत.

                प्रत्येक खत विक्रेत्यांकडील खतांचा अद्ययावत साठा पाहण्यासाठी osmanabadsao.blogspot.com या ब्लॉगवर शेतक-यांना पाहता येईल. तसेच विशिष्ट कंपनी अथवा ग्रेडच्या खतांचा आग्रह न धरता शेतक-यांनी उपलब्ध खतांमधून शिफारसीप्रमाणे पिकास खत मात्रा दयाव्यात. तसेच 100 मी.मी.पेक्षा जास्त पाऊस अथवा जमिनीत पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी करु नये. आपल्या भागात सोयाबीनवर खोडमाशी व करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बिजप्रक्रिया करुनच पेरणी करावी. पेरणी करताना बियाणे 4 से.मी पेक्षा जास्त खोलीवर पडू नये याची काळजी घ्यावी. सोयाबीन बियाणे घरचे अथवा बॅगमधले असले तरी उगवणक्षमता तपासूनच पेरणी करावी.

                  निविष्ठा उपलब्धतेच्या व दराच्या अनुषंगाने  तक्रारीचे निराकरण करण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून जिल्हास्तरावरील तक्रार निवारण कक्षाचा संपर्क क्रमांक 02472223794  व भ्रमणध्वनी क्रमांक 9405046701 असा असून यावर whatsapp द्वारे देखील तक्रार स्विकारली जाणार आहे. तक्रार नोंदवताना नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व तक्रारीचा थोडक्यात तपशील द्यावा तसेच साध्या को-या कागदावर ही माहिती लिहून त्याचे छायाचित्र काढून ते व्हॉटससॲप ने पाठवता येऊ शकेल . याशिवाय शेतक-यांना आपले तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी, पंचायत समिती कृषि अधिकारी तसेच क्षेत्रीय कर्मचारी यांचेकडे देखील तक्रार नोंदवता येईल.


 

From around the web