उस्मानाबाद पीक विम्या संदर्भातील निकालाबाबत देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारवर निशाणा

उस्मानाबाद - उस्मानाबादच्या पीक विम्या संदर्भातील निकालाबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सातत्याने केंद्र सरकारवर टीका करण्यापलिकडे आणि जबाबदारी ढकलण्यापलिकडे महाविकास आघाडी सरकार काहीच करीत नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
फडणवीस यांनी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या कामाचे कौतुकही केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनात उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब भाजयुमो अध्यक्ष प्रशांत लोमटे आणि इतरांनी जिल्ह्यातील 3,57,287 शेतकर्यांवर पीकविम्यासंदर्भात झालेल्या अन्यायाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. या सर्व शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विमा कंपन्यांनी 6 आठवड्यात या शेतकर्यांना त्यांची नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला. विमा कंपन्यांनी ही भरपाई न दिल्यास 6 आठवड्याच्या आत राज्य सरकारने ही नुकसानभरपाई द्यावी आणि शेतकर्यांना मदत करावी, असे सुस्पष्ट आदेश दिले आहेत.
सातत्याने केंद्र सरकारवर टीका करण्यापलिकडे आणि जबाबदारी ढकलण्यापलिकडे महाविकास आघाडी सरकार काहीच करीत नाही.राज्यात सरकार असताना शेतकर्यांना आपले लढे उच्च न्यायालयापर्यंत लढावे लागत असतील, तर यापेक्षा कोणते दुर्दैव त्यांच्या नशिबी यावे?
शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे ठाकलेले आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि भाजपाचे सर्व कार्यकर्ते, इतर सर्व याचिकाकर्ते अशा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन !आणि शेतकऱ्यांना न्याय दिल्याबद्दल मा. उच्च न्यायालयाचे सुद्धा खूप खूप आभार!