प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा हप्ता भरण्यास 31 जुलैपर्यंत मुदत
उस्मानाबाद - खरीप हंगामात नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकरी नोंदणीसाठी राष्ट्रीय विमा संकेतस्थळावर कार्यान्वित करण्यासंदर्भात शासनाने निर्देश दिलेले आहेत. चालू खरीप हंगामात पीक विम्याचा हप्ता भरण्याची अंतिम मुदत कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना दि. 31 जुलै 2022 ही आहे.
पीक विमा योजना ही कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभाग घ्यावयाचा नसेल तर कर्ज घेतलेल्या अधिसुचित पिकांकरीता नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधी पर्यंत संबंधित बँकेस विमा हप्ता कपात न करण्याबाबत घोषणापत्र देणे आवश्यक आहे. जे कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होण्याबाबत घोषणापत्र देणार नाहीत, त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी दोन टक्के आणि नगदी पिकासाठी पाच टक्के असा मर्यादीत ठेवण्यात आला आहे. शेतकऱ्यांना ज्या पिकांचा विमा उतरावयाचा आहे ते पीक शेतात पेरल्या बद्दलचे स्वयंघोषणापत्र, सात बारा उतारा, आधार कार्ड आणि बँक पासबूकच्या झेरॉक्स प्रतीसह नजिकच्या बँकेत अथवा आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्ता भरुन पीक संरक्षित करावे.
पीक विमा भरण्यासाठी ई-पीक पहाणीवर माहिती भरणे अनिवार्य नाही, मात्र विमा नुकसान भरपाई मिळताना काहीं अडचणी आल्यास ई-पीक पहाणीचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो. त्यामुळे आता त्वरित विमा भरुन घ्यावा आणि त्यानंतर ई-पीक पहाणी करुन घ्यावी. तसेच शेवटच्या आठवड्यात विमा पोर्टलवर लोड येणे, नेटवर्क नसणे, सर्व्हर डाऊन होणे अशा अडचणी दरवर्षी येत असतात. त्यामुळे शेतकरी विमा भरण्यापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे विमा भरण्याची 31 जुलै2022 ही शेवटची तारीख असली तरी तोपर्यंत वाट न पाहता शेतकऱ्यांनी त्वरित पीक विमा भरुन घ्यावा, असे अवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.