उस्मानाबाद जिल्ह्यात गोगलगायी व इतर किडीमुळे पिकांचे नुकसान 

नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करून कोल्हापूर सांगलीच्या धर्तीवर मदत देण्याची आ. कैलास पाटील यांची मागणी 
 
d

धाराशिव ( उस्मानाबाद ) - दरवर्षी कोणत्या न् कोणत्या आपत्तीने शेतकऱ्यांना पिक हाताशी लागत नाही, वाढलेल्या उत्पादन खर्चाचा विचार केला तर त्याचे आर्थिक गणित नेहमीच नुकसानीच होत आहे. गेल्या दोन -तीन वर्षापासुन सातत्याने अतिवृष्टीच्या आपत्तीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पिक पाण्यात गेले आहे. 

धाराशिव जिल्ह्यात या वर्षी जवळपास ८०% पेरणी पूर्ण झाली असून मुख्य पिक सोयाबीन आहे. गोगलगाय व इतर किडीमुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पीक उध्वस्त झाले आहे. मागील काही दिवसात संततधार पावसामुळे ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे, त्या शेतकऱ्यांचे बियाणे जमिनीतच खराब झाल्यामुळे ते उगवलेले नाही. या दोन्ही कारणामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणी करण्याची वेळ आली असुन अगोदरच उत्पादन खर्च वाढल्याने पुन्हा तेवढाच खर्च करणे शेतकऱ्यांना परवडणारा नाही. कृषी व महसूल विभागाला  झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणे आवश्यक असताना राज्य शासनाकडुन आदेश आले नसल्याचे कारण देऊन रीतसर पंचनामे चालू केले नाहीत.

दरवर्षी पंतप्रधान पिक विमा योजनेसाठी अर्ज करणाऱ्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संख्या जवळपास सहा लाखाच्या घरात असते. मात्र गेल्या दोन वर्षाचा अनुभव पाहता अद्यापपर्यंत जिल्ह्यातील फक्त 80 ते 90 हजाराच्या आसपास शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. पंतप्रधान पिक विमा योजनेमध्ये पीक संरक्षण केले जाते. पिकाचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळते. परंतु सद्यस्थितीत पेरणी झाल्यानंतर उगवून आलेल्या सोयाबीनचे गोगलगायी व इतर किडीमुळे तसेच पेरणी केल्यानंतर पावसाने खराब होऊन न उगवलेल्या पिकाच्या नुकसानीची पंतप्रधान पिक विमा योजनेंतर्गत मदत मिळण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे शेतकरी दोन्ही बाजूने आर्थिक संकटात सापडला आहे. 

d


अगदी पिक उगवणीच्या वेळीच म्हणजे सूरुवातीलाच धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसून त्याच्या संपुर्ण हंगामावर पाणी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अशावेळी सरकारकडुन त्यांना  मदतीचा हात मिळावा अशी अपेक्षा आमदार कैलास पाटील यांनी  केली आहे.  शासन म्हणुन आपण अशाप्रकारे शेतकऱ्यांचे नुकसान समोर होत असताना उघड्या डोळ्याने पाहण्याची वेळ येत असेल तर शासन म्हणुन आपण काय करणार आहोत की नाही असा प्रश्न आमदार कैलास पाटील यानी उपस्थित केला आहे. कृषी व महसूल विभागाला पंचनामा करण्यासाठी तातडीने आदेशित करून २०१९ मध्ये मा. देवेंदजी फडणवीस मुख्यमंत्री असताना कोल्हापूर, सांगलीच्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना कोरडवाहू पिकांना प्रती हेक्टरी २०४०० रुपये मदत देऊन व दोन वर्षासाठीचे १ हेक्टरपर्यंतचे पीककर्ज माफ केले होते. याचपद्धतीने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक आहे. 


तरी कृषी व महसूल विभागाला धाराशिव जिल्ह्यातील गोगलगाय व इतर किडीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्यासाठी तातडीने आदेश देऊन आपण राज्य शासन म्हणून कोल्हापूर, सांगलीच्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना ज्यापद्धतीने मदत केली होती त्याच पद्धतीने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी व त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी कैलास पाटील यांनी केली आहे.
 

From around the web