पीक विमा २०२० :  लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी  वितरणासाठी उपलब्ध

- आ.राणाजगजितसिंह पाटील
 
rana

उस्मानाबाद  -  प्रधानमंत्री फसल बीमा योजना खरीप २०२० प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे विमा कंपनीने २ लाख ३ हजार ६६६ शेतकऱ्यांची पहिली यादी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध केलेली आहे व प्रति हेक्‍टरी रुपये १८००० नुकसान भरपाई देण्याचे देखील कबूल केले असल्याची माहिती आ. राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिली आहे.

 उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचा आदेश कायम राखत मा. सर्वोच्च न्यायालयाने २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत ३ लाख ५७ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई अदा करण्याचे आदेश दिले होते. तांत्रिक अडचणीमुळे विलंब झाला परंतु मा. सर्वोच्च न्यायालयाकडील रुपये २०१.३४ कोटीचा धनाकर्ष शुक्रवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२२ रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या खात्यावर जमा करण्यात आला असून सदरील रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी पुढील एक दोन दिवसात उपलब्ध होणार आहे. 

दरम्यानच्या काळात विमा कंपनीने २ लाख ३ हजार ६६६ शेतकऱ्यांची यादी उपलब्ध करून दिल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. तसेच आपल्या मागणीप्रमाणे ४०% नुकसान गृहीत धरून रुपये १८००० प्रति हेक्टर प्रमाणे भरपाई देण्याचे त्यांनी मान्य केले आहे. उद्या दिनांक २५ ऑक्टोबर रोजी पुनश्च विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे, व पुढील याद्या बाबत चर्चा केली जाणार आहे. उपलब्ध २०१.३४ कोटी मधून या २ लाख ३ हजार ६६६  शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई अदा करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

आपल्या याचिकाकर्त्यांनी मा. सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केलेली आहे व याची रीतसर नोटीस विमा कंपनी व जिल्हाधिकारी यांना देण्यात येत आहे. पुढील आठवड्यात यावर सुनावणी व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत,असेही आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. 

आमदार कैलास पाटील यांचे आमरण उपोषण सुरु 

sd


सन 2020 चा पिक विमा शेतकऱ्यांच्या  बँक खात्यावर तात्काळ जमा करावा, या व अन्य मागण्यासाठी आमदार कैलास पाटील यांनी आज ( सोमवार ) उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केलं आहे. 

या उपोषणात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सहभाग घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य करण्याची मागणी शिंदे - फडणवीस सरकारकडे केली.
 याप्रसंगी  माजी नगराध्यक्ष नंदुभैय्या राजेनिंबाकर, तालुका प्रमुख सतिशकुमार सोमाणी, माजी नगरसेवक राजाभाऊ पवार, तसेच युवासेना जिल्हाप्रमुख तथा राज्य विस्तारक अक्षय ढोबळे, धाराशिव युवासेनेचे तालुकाप्रमुख वैभव वीर, आय.टी सेल जिल्हाप्रमुख रणजित महाडिक, तुळजापूर उपतालुकाप्रमख रोहित चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य संग्रामभैय्या देशमुख, गजेंद्र जाधव, नगरसेवक सोमनाथ अप्पा गुरव, माजी शहरप्रमुख प्रविण कोकाटे, भिमाआण्णा जाधव, अतिक सय्यद, बळीराम कांबळे, तसेच अनेक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

From around the web