सावधान ! पशुपालकांनो सतर्क रहा ...   

 
z

उस्मानाबाद-  लंपी त्वचा रोग या रोगाच्या प्रादुर्भाव बाबत जिल्ह्यातील पशुपालकां मध्ये या आजाराबाबत जनजागृती करणे अत्यावश्यक आहे.लंपी त्वचा रोग हा गाई, म्हशींमध्ये होणारा विषाणू   जन्य आजार असून या आजारात जनावरास प्रथम तीव्रस्वरूपाचा ताप येतो त्यानंतर डोळ्यातून पाणी व नाकातूनस्त्राव येणे सुरु होते.लसीकाग्रंथींना सुज येते. जनावराची भुक मंदावून दुध उत्पादन कमी होते. जनावराचे डोके, मान, पाय, पाठ मायांग,कास इ. भागावरील त्वचेवर १ ते ५ से.मी.व्यासाच्या गाठी येतात. काहीवेळा तोंडात, नाकात व डोळ्यात व्रण येतात. तोंडातील व्रणांमुळे जनावरास चारा खाण्यास व रवंथ करण्यास त्रास होतो.डोळ्यातील व्रणांमुळे चिपडे येऊन पापण्या चिकटुन दृष्टीबाधीत होते.

 या आजारात जनावराला फुफ्फुसदाह,स्तनदाह देखील होतो.रक्तातील पांढ-या पेशी व प्लेटलेट्स कमी होतात त्यामुळे जनावराला अन्य जीवानूजन्य आजार होण्याची शक्यता वाढते.पायावर सूज आल्याने जनावर लंगडते.लंपी त्वचा रोग आजाराचा प्रसार हा प्रामुख्याने माश्या, गोचीड, चिलटे यांचे पासुन होतो.या रोगाचा पसरण्याचा दर हा १० ते २० टक्के असून काही वेळा ४५ टक्के पर्यंतही असू शकतो मृत्युदर १ ते ५ टक्या पर्यंत आहे. या रोगाच्या नियंत्रणासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात. गोठा परिसर स्वच्छ व हवेशीर ठेवावा.परिसरात पाणी साठणार नाही,दुर्गंधी होणार नाही व किटक येणार नाहीत यासाठी दक्षता घ्यावी.किटक नाशकांचा जनावरांवर,गोठ्यात व परिसरात वापर करावा. फवारणी करावी. सद्यस्थितीत भारतात लंपी त्वचा रोगाची लस उपलब्ध नाही. 

शेळ्यांची कॅप्रीपॉक्स (उत्तर काशी स्ट्रेन) लस वापरुन या रोगाचे नियंत्रण करता येते. साथ रोग सुरु असताना बाधित गावांत व ५ कि.मि त्रिज्येच्या क्षेत्रातील गावांत लसीकरण करण्यात यावे. केवळ निरोगी जनावरास लसीकरण करावे. लसीकरण करताना प्रत्येक जनावरासाठी नविन सुई वापरावी.आजारी जनावराचे निरोगी जनावरां पासून विलगीकरण करावे.आजारी व निरोगी जनावरे एकाच ठिकाणी चरावयास अगर पाण्यावर सोडू नयेत.डास चावणा-या माश्या, चावणारे किटक इ.दुर करणारी अनेक नैसर्गिक :औषधे व प्लाय फ्रायर यंत्र यांचा वापर करा.गोठ्यात पहाटे व सायंकाळी डास मोठ्या प्रमाणात शिरकाव करतात,अश्यावेळी मडक्यात सुके शेण जाळून धुर करावा. अश्यावेळी  निलगिरी तेल, कापूर, करंज तेल,कडुनिंब तेल, गवती चहाची पाने इ. चा वापर केल्यास डास गोठ्यातून दुर पळून जातात. जनावरांना चरायला सोडण्यापूर्वी अंगावरकरंज तेल, कडूनिंब तेल लावल्यास किटक चावत नाहीत. साथ रोग सुरु असताना महिष वर्गीय जनावरे गोवर्ग जनावरां पासून स्वतंत्र बांधावीत. साथ रोग सुरु असताना १०कि. मि त्रिज्येच्या क्षेत्रातील जनावरांचे बाजार बंद करावेत, जनावरांचे मेळावे वप्रदर्शने आयोजित करु नयेत.

बाधीत क्षेत्रातील जनावरांचे गोठे, परिसर, खाद्य भांडी, पाणी भांडी, हत्यारे, यंत्रसामग्री हि, योग्य औषधी उदा. १ टक्के क्लोरोफॉर्म, १ टक्के फॉरमॅलिन, २ टक्के फिनॉल,२ टक्के सोडियम हायपो क्लोराईड, आयोडीन द्रावण, इ.चा वापर करून निर्जंतूक करावे. या रोगाची लक्षणे दाखवणारे जनावर आढळून आल्यास पशुपालकाने, ग्रामसेवकाने, तलाठ्याने , लोक प्रतिनिधीने अगर गावातील अन्य कोणत्याही व्यक्तीने याची खबर तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकाला दयावी. म्हणजे तातडीने पशुवैद्यकीय उपचार करणे, रोगाचे निश्चित निदान  करणे, रोग नियंत्रणात आणणे,रोगाचा प्रसार रोखणे इ. कार्यवाही करणे शक्य होईल. 

ज्या गावामध्ये या रोगाने बाधिक जनावरे आढळतील त्यागावातील पशुंची खरेदी विक्री काही कालावधीसाठी बंदकरण्यात यावी. आजारी जनावरांचा पशुवैद्यका कडून दैनंदिन उपचार करुन घ्यावे.जिल्हायातील सर्व पशुपालकांना अवाहन करण्यात येते की, आपल्या पशुमध्ये लंपी त्वचा रोगाची लक्षणे दिसल्यास तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी कळविले आहे.                                                                                                                                                                          

From around the web