बाजाराचा अभ्यास करुनच शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री करण्याचे आवाहन

  चांगले सोयाबीन बियाणे म्हणून राखून ठेवावे - जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 
 
soyabin

 उस्मानाबाद -  बाजारात सद्या सोयाबीनचे वाढत असलेले दर विचारात घेता शेतकरी त्यांच्याकडे असलेले सोयाबीन विक्री करु शकतात. मात्र सोयाबीन दराबाबत शेतक-यांनी कुठल्याही अफवेला बळी न पडता बाजाराचा संपूर्ण अभ्यास करुनच सोयाबीन विक्री करावे. तसेच विक्री करत असताना शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले चांगले सोयाबीन बियाणे खरीप हंगाम 2022 च्या पेरणीसाठी आवश्यक आहे तेवढे राखून ठेवावे,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एम.डी.तिर्थकर यांनी केले आहे.

         जिल्हयाचे खरीप 2021 मधील पेरणी क्षेत्र 6 लाख 5 हजार हेक्टर होते. त्यापैकी सोयाबीन या पिंकाचे क्षेत्र 3 लाख 84 हजार हेक्टर होते. सोयाबीन हे आपल्या जिल्हयाचे खरिपातील मुख्य पीक असून पेरणीच्या 63 टक्के क्षेत्र हे सोयाबीन पीकाखालील आहे. सोयाबीनला मागील वर्षी मिळालेले चांगले भाव,आलेली उत्पादकता यामुळे चालू वर्षी सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात मोठी वाढ संभवत आहे.

           विद्यापीठांनी संशोधित केलेले अनेक वाण जे एस 335 या वाणापेक्षा सरस असल्याचे दिसून आले आहे. त्यात प्रामुख्याने MAUS 71, MAUS 162,MAUS 612, MAUS 158, DS 228, KDS 726, KDS 753 या वाणांचा उल्लेख करावा लागेल. यातील काही वाणांचे एकरी 14 ते 15 क्विंटल उत्पादन शेतक-यांना मिळाले आहे, विशेषत: कोरडवाहू परस्थितीमध्ये MAUS 158 आणि DS 228 या वाणांची उत्पादकता चांगली दिसून आलेली आहे. त्यामुळे शेतक-यांनी या वाणांचे किंवा ज्या वाणांची उत्पादकता त्यांना चांगली मिळाली आहे. त्या वाणाचे बियाणे राखून ठेवावे. 

यातील काही वाण जसे KDS 726 आणि KDS 753 हे कृषी सेवा केंद्रातून मोठया प्रमाणात मिळण्यासाठी 3-4 वर्षाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे शेतक-यांना पसंतीत उतरलेल्या या सारख्या वाणांसाठी घरचे बियाणे राखून ठेवणे. हा या वाणाखालील क्षेत्र वाढविण्याचा एकमात्र पर्याय आहे. तसेच चालू वर्षी उन्हाळी हंगामामध्ये 791 हेक्टर वर सोयाबीनचा पेरा झालेला असून त्यामधून देखील सोयाबीन बियाणे खरीप हंगाम 2022 साठी वापर शेतक-यांना करता येणार आहे.अधिक माहितीसाठी आपल्या गावच्या कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी तसेच संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले.
 

From around the web