पोक्रा योजनेअंतर्गत जिल्हयातील 287 गावांना सरासरी 40 लाखांचे अनुदान

 
d

उस्मानाबाद - नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोक्रा योजना ही शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरत आहे.बदलत्या हवामानाचा सर्वात मोठा दुष्परिणाम शेती आणि शेती व्यवसायावर होत आहे. यावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील 287 गावांमध्ये जागतिक बँकेच्या साहाय्याने पोक्रा प्रकल्प राबविण्यात येत आहे. योजनेच्या माध्यमातून जिल्हयातील 287 गावांना प्रती गाव सरसरी 40 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हयातील शेतकरी  सक्षम होण्यास मदत होत आहे.

अंतर्गत वैयक्तिक आणि सामुदायिक शेती घटक राबविण्याकरिता अनुदान देण्यात येते. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे त्वरित अनुदान मिळते. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहेत. वैयक्तिक लाभ घटकांमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातून 33 हजार 711 शेतकऱ्यांच्या खात्यावर 107 कोटी रुपयांचे अनुदान  जमा करण्यात आले आहे. यामध्ये सर्वात जास्त 75 कोटी 26 लाख अनुदान सूक्ष्मसिंचन घटकासाठी खर्च झाले आहे. त्यामुळे सुमारे 47 हजार 630 एकर जमीन सूक्ष्म सिंचनाखाली आली आहे.996 लाभार्थ्यांनी 1560 एकर पेक्षा जास्त क्षेत्रावर फळबाग लागवड करून 4 कोटी 96  लाखांपर्यंतच्या  अनुदानाचा लाभ घेतला आहे.253 शेततळी आणि 80 शेततळी अस्तरीकरण पूर्ण करण्यात आले आहे. त्यापोटी पाच कोटी 11 लाख रुपये अनुदान खर्च झाले आहे.

    जिल्हयातील 55 शेतकऱ्यांनी पॉलीहाऊस आणि शेडनेट योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांना सहा केाटी दोन लाख रूपये अनुदान वाटप करण्यात आले आहे. पाईप मोटार या घटकासाठी 4033 शेतकऱ्यांना सहा कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.कृषी यांत्रिकरण घटकासाठी 278 शेतकऱ्यांना चार कोटी 41 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.

         तालुकानिहाय खर्च - उस्मानाबाद 34 कोटी,कळंब 27 कोटी,तुळजापूर 14 कोटी,उमरगा सात कोटी, लोहारा पाच कोटी, भूम आठ कोटी, परांडा सात कोटी,वाशी पाच कोटी रुपये आहे.13 गावांमध्ये मृद आणि जलसंधारणाची दोन कोटी 84 लाख रुपयांची कामे राबविली आहेत. त्यामुळे जमीनीतील पाणी पातळी  वाढण्यास मदत झाली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील 239 गावांमध्ये 2024 पर्यंत कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. 33 शेतकरी गट आणि कंपनी यांना तीन कोटी रुपये अनुदान शेती व्यवसाय प्रकल्पासाठी  वाटप करण्यात आले आहे.

         पोक्रा प्रकल्पतंर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर मृद् आणि जलसंधारणाची कामे करण्यात येणार आहेत, असे  जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी म्हटले आहे.

   गावातील मतभेद बाजूला सारून शेती आणि शेती पूरक व्यवसाय उभे करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र यावे यासाठी पोक्रा अंतर्गत 60 टक्के अनुदान आहे याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख  यांनी केले आहे.


 

From around the web