दहा दिवसापासून वीज पुरवठा खंडित झाल्याने खामसवाडी येथील संतप्त शेतकर्‍यांचे महावितरण कार्यालयात आंदोलन

 तब्बल तीन तास शेतकर्‍यांनी मांडला कार्यालयात ठिय्या
 
d
* आत्मदहनाच्या पवित्र्यामुळे अधिकारी व पोलिसांनी काढली समजूत
* अधीक्षक अभियंता पाटील यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

उस्मानाबाद - ट्रान्स्फार्मरमधील बिघाडामुळे तब्बल दहा दिवसापासून वीज पुरवठा खंडित असल्याने शेती आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असला तरी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे संतप्त झालेल्या कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील शेतकर्‍यांनी आज (दि.13) उस्मानाबाद येथील महावितरण कार्यालयात आंदोलन केले. तीन तास कार्यालयातच ठिय्या मांडून शेतकर्‍यांनी वीज पुरवठा सुरळीत झाल्याशिवाय हलणार नाही असा पवित्रा घेतल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. तर आठवडाभरापूर्वीच शेतकर्‍यांनी आत्महदहनाचा इशाराही दिलेला असल्यामुळे अधिकार्‍यांनी  आंदोलकांची समजूत काढून चार दिवसात पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.

खामसवाडी गावातील ट्रान्सफरच्या बिघाडामुळे तब्बल दहा दिवसापासून वीज पुरवठा खंडित झालेला आहे. तो तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी खामसवाडी येथील शेतकर्‍यांनी 7 जून रोजी निवेदनाद्वारे उस्मानाबाद शहरातील महावितरण कार्यालयाला आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवारी खामसवाडी येथील शेतकर्‍यांनी महावितरण कार्यालयात तब्बल 3 तासापासून ठिय्या मांडून वीज पुरवठ्याच्या प्रश्नावर अधिकार्‍यांना जाब विचारला.     यावेळी महावितरण कार्यालयातील प्रभारी कार्यकारी अभियंता रवींद्र पवार यांनी शेतकर्‍यांशी चर्चा केली. परंतु जोपर्यंत वीज पुरवठा सुरू होत नाही, तोपर्यंत आम्ही आत्मदहनाच्या निर्णयावर ठाम आहोत असा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शेख व त्यांच्या सहकार्‍यांनीही मध्यस्थी करून शेतकर्‍यांची समजूत काढली. त्यानंतर महावितरणचे अभियंता श्री.पवार यांनी लेखी आश्वासन दिले. परंतु हे आश्वासन शेतकर्‍यांनी अमान्य केल्यामुळे महावितरणचे अधीक्षक अभियंता एस. बी. पाटील यांची भेट घ्यावी, असे आंदोलनकर्त्यांना कळविले. यावेळी अधीक्षक अभियंता पाटील यांनी चार दिवसात पूर्ण क्षमतेने विद्युत पुरवठा सुरळीत केला जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकर्‍यांनी आंदोलन मागे घेतले.

आंदोलनात अशोक बापू शेळके, प्रभाकर शेळके, विश्वास कोळगे, राजेंद्र गरड, महेश शेळके, लक्ष्मण तांबारे, आबा गरड, आशिष जोशी, महेश डोईफोडे, रणजित शेळके, रणजित साळुंके, भागवत डोईफोडे, प्रताप घावटे, अमोल डोईफोडे, सचिन शेळके, अनिल डोईफोडे, शरद शेळके, अजिंक्य शेळके, राजपाल शेळके यांच्यासह खामसवाडी तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

From around the web