उस्मानाबाद जिल्ह्यातील  केवळ ६६ हजार ७२४ बाधित क्षेत्रासाठी ९० कोटीच्या मदतीची घोषणा

उर्वरित शेतकऱ्यांना मदतीसाठी दाखविला ठेंगा  ? शेतकऱ्यांच्या आशेवर निसर्गा पाठोपाठ सरकारनेही फिरविला वरवंटा  !
 
as
सरसकट नुकसान भरपाई मदतीचे आश्वासन गेले अतिवृष्टी व सततच्या पावसाच्या पाण्यात वाहून ! 

उस्मानाबाद  - यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी, सततचा पाऊस, गोगलगाय, येलो मोझॅईक, खोड अळी व इतर किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या शेतावरील सोयाबीन, तूर, उडीद, मूग, बाजरी, मका आदींसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हासू गायब होऊन त्यांच्या डोळ्यात आसू तरळले आहेत. तसेच शासन दरबारी न्याय मिळणार नाही. या धास्तीने शेतकरी पुर्णतः धास्तावले होते. त्यांच्यामध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले होते. त्या नैराश्यातूनच ८ शेतकऱ्यांनी गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले.  मात्र राज्य सरकारने हेक्टरी १३ हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत जाहीर केल्या प्रमाणे तो निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील ६६ हजार ७२३ बाधित क्षेत्रासाठी ९० कोटी ७४ लाख ३६ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसा शासनादेश कृषी मंत्री अब्दुल सत्तार काढला असल्याचे सांगितले आहे. या शासनाद्वारे या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीपोटी राज्यासाठी ३ हजार ५०१ कोटींच्या नुकसान भरपाईची घोषणा केली आहे.

अतिवृष्टी, गोगलगाय, येलो मोझॅईक, खोड किडा, भुंगा, इतर किडींच्या प्रादुर्भावामुळे तर काही ठिकाणी कंबरे इतके सोयाबीन असताना त्याला ना फुले ना शेंगा लागल्या आहेत. या  संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. यात अनेक दिवस उलटूनही सरकारकडून कसलीच मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अशात गणेश विसर्जन दिनी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने नुकसानग्रस्त १९ लाख शेतकऱ्यांना सुमारे ३ हजार ५०१ कोटी रुपयांची आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. यात मराठवाडा विभागाला १ हजार ८ कोटींची नुकसान भरपाई दिली जाणार आहे. विशेष म्हणजे पुढील २ दिवसांमध्ये या नुकसान भरपाईचे वाटप करण्यात येणार आहे. 

राज्य सरकारने जाहीर केलेल्या नुकसान भरपाईनुसार उस्मानाबादसाठी ६६ हजार ७२३ बाधित क्षेत्रासाठी ९० कोटी ७४ लाख‌ ३६ हजार रुपये तसेच जालना जिल्ह्यातील २,३११.७९ या बाधित क्षेत्रासाठी ३ कोटी ७१ लाख ८४‌ हजार रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. तसेच परभणीसाठी १,१७९ बाधित क्षेत्रासाठी १ कोटी ६० लाख‌ हजार रुपये, तर हिंगोसाठी १ लाख १३ हजार ६२० बाधित क्षेत्रासाठी १५७ कोटी ४ लाख ५२ हजार रुपये तसेच नांदेडसाठी ५ लाख २७ हजार ४९१ बाधित क्षेत्रासाठी ७१७ कोटी ८८ लाख ९२ हजार रुपये व लातूरसाठी २७.४२५ बाधित क्षेत्रासाठी ३७ कोटी ३० लाख ८३ हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त भागातील पिकांची पाहणी शिवसेनेचे आ. कैलास पाटील यांनी केली. त्यानंतर त्यांनी राज्य शासनाकडे हेक्टरी ५० हजार रुपये मदतीची शेतकऱ्यांच्यावतीने मागणी केली आहे. ती मदत सरकार देणार की केवळ आश्वासनावरच गुंडाळून बोळवण करणार ? असा प्रश्न देखील यामुळे निर्माण झाला आहे.

From around the web