धाराशिव जिल्ह्यातील प्रमाणीकरण केलेल्या ६९१० शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदानाचे रु. १०५० कोटी उपलब्ध

- आ. राणाजगजितसिंह पाटील
 
farmer

धाराशिव / उस्मानाबाद  : शिंदे-फडणवीस सरकारने ५० हजार  प्रोत्साहन पर अनुदानाची दुसऱ्या टप्प्यातील रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी रु. १०५० कोटी उपलब्ध केले आहेत व प्रमाणीकरण झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम पुढील आठवड्यात जमा होईल. अधिकचे रू. १००० कोटी देखिल लवकरच उपलब्ध होणार असल्याचीही माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान देण्याची केवळ घोषणाच करण्यात आली होती, मात्र अडीच वर्षात यासाठी कवडीचीही तरतूद तत्कालीन सरकारने केली नाही. शिंदे - फडणवीस सरकार सत्तेत येताच यासाठी रु. ४७०० कोटींची तरतूद करण्यात आली. याचा लाभ राज्यातील जवळपास १४ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. या योजनेत धाराशिव जिल्ह्यातील एकूण ४३०९६ लाभार्थी असून यातील ३४४७१ शेतकऱ्यांना यापूर्वीच रु. १०१.६० कोटी वितरित करण्यात आले आहेत.

डिसेंबर मध्ये पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी प्रकाशित करण्यात आली होती. या यादीमध्ये प्रमाणीकरण झालेल्या तसेच यापूर्वी प्रमाणीकरण करून प्रोत्साहनपर अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. यासाठी आता रु. १०५० कोटी वित्त व नियोजन विभागातून प्रत्यक्षात उपलब्ध झाले आहेत. पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणे अपेक्षित आहे. धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील प्रमाणीकरण केलेल्या ६९१० शेतकऱ्यांना या निधीमधून प्रोत्साहन पर अनुदानचे प्रत्येकी रू. ५०,०००/- प्राप्त होणार आहेत.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिंदे - फडणवीस सरकार कायम कार्यतत्पर असून अतिवृष्टी, सततचा पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तीसह नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील सरकार भरघोस मदत करत आहे, असे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. 

From around the web