उस्मानाबाद जिल्ह्यात २६ हजार हेक्टर ऊस गाळपाअभावी शिल्लक 

शेतकरी चिंतेत ... ऊस तोडणीचे गावनिहाय नियोजन होणार ... 
 
s

उस्मानाबाद  - उस्मानाबाद जिल्ह्यात खुप मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक असल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत व तणावात आहेत. या अनुषंगाने कृषी विभागाला गावनिहाय शिल्लक उसाची आकडेवारी काढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. फेब्रुवारी अखेर जिल्ह्यात २६,००० हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर ऊस तोडणी बाकी असल्याचे निदर्शनास आले आहे. विषयाच्या गांभिर्याबाबत राज्याच्या साखर संचालकांशी केलेल्या चर्चेंअंती जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी गावनिहाय नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व विभागीय सहसंचालक (साखर) यांना देण्यात आल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी १४ महिने होवून देखील कारखान्यांनी ऊस गाळपासाठी नेलेला नाही अशा स्वरूपाच्या तक्रारी केल्या होत्या. या अनुषंगाने गेल्या आठवड्यात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून गावनिहाय ऊसाची परिस्थिती संकलित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सदरील माहिती संकलित करण्यात आली असून जिल्ह्यातील एकूण शिल्लक २६००० हेक्टर क्षेत्रापैकी  उस्मानाबाद तालुक्यात ५००० हे. पेक्षा जास्त तर कळंब व परंडा तालुक्यात ७००० हेक्टर पेक्षा जास्त उस शिल्लक असल्याचे स्पष्ट झाले आहे.       

   

जिल्ह्याचा विचार केला तर काही तालुक्यामध्ये ८०% गाळप झाले व काही तालुक्यामध्ये ५०% सुद्धा झालेले नाही. हा असमतोल व शेतकऱ्यांमध्ये वाढत असलेल्या चिंतेच्या वातावरणामुळे राज्याचे साखर संचालक श्री. शेखर गायकवाड यांच्या बरोबर सविस्तर चर्चा झाली आहे. जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी गावनिहाय नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व विभागीय सहआयुक्त (साखर) यांना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या दैनिक गाळप क्षमतेचा विचार केला तर योग्य नियोजनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ऊसाचे गाळप कमी कालावधीत होवू शकेल. साखर कारखानदारांबरोबरच गुळ पावडर उत्पादकांना देखील बैठकीसाठी बोलविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी व प्रादेशिक सहसंचालक (साखर), सोलापूर यांच्या उपस्थित कार्यपद्धती व जबाबदारी सुनिश्चित करून कमीत कमी कालावधीत ऊस तोडणीचे  नियोजन करणे अपेक्षित आहे. हा प्रश्न मार्गी लागुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळे पर्यंत पाठपुरावा चालू राहील असे आ. पाटील यांनी आश्वासित केले आहे.

From around the web