खरीप २०२२ चे २०० कोटी रुपये पुढील आठवड्यात अपेक्षित - आ. राणाजगजितसिंह पाटील
उस्मानाबाद - भारतीय कृषी विमा कंपनीकडे राज्य सरकारच्या हप्त्याची रक्कम जमा झाली असून पुढील तीन ते चार दिवसात केंद्र सरकारचा हिस्सा प्राप्त होणे अपेक्षित आहे. ही रक्कम मिळताच उर्वरित पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना खरीप २०२२ ची नुकसान भरपाई वितरित करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय कृषी विमा कंपनीचे महाव्यवस्थापक तथा सहसचिव श्री सिद्धेश रामसुब्रमण्यम यांनी आ. राणाजगजितसिंह पाटील यांना दिली आहे.
खरीप २०२२ च्या नुकसानीपोटी आजवर विमा कंपनीने रुपये २५८ कोटी वितरित केले असून पुढील रुपये २०० कोटी १५ दिवसात वितरित करण्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिनांक १९ जानेवारी रोजी झालेल्या चर्चे दरम्यान मान्य केले होते. या अनुषंगाने सतत पाठपुरावा सुरू असून केंद्र सरकारचा हप्ता प्राप्त होताच ही रक्कम वितरित होणार आहे. पुढील तीन ते चार दिवसात विमा कंपनीकडे ही रक्कम वर्ग होईल.
विमा कंपनीच्या जिल्हा कार्यालयाकडे जवळपास ४० हजार पंचनामे उपलब्ध झाले होते, मात्र धाराशिव येथील कार्यालयावर हल्ला झाल्यापासून राज्यभरातील कार्यालये बंद असल्याने पंचनामे जमा करण्याची प्रक्रिया ठप्प असल्याची माहिती वीमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. अत्यल्प नुकसान भरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी पंचनामाच्या प्रती मिळणे अत्यावश्यक असून त्या तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी विमा कंपनीचे महाव्यवस्थापक तथा सहसचिव श्री सिद्धेश रामसुब्रमण्यम यांना सूचित केले आहे. विमा कंपनीची मुंबई बाहेरील कार्यालये बंद असल्याने मुंबई येथील कार्यालयात पंचनामे जमा करण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे त्यांनी मान्य केले आहे. दुसऱ्या टप्प्यातील हे रुपये २०० कोटी प्राप्त झाल्यानंतर नुकसानीच्या सूचना दिलेल्या परंतु पंचनामे न झालेल्या व अत्यल्प पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही अनुसरण्यात येणार आहे.
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम जमा होत असून खरीप २०२० व २०२१ च्या उर्वरित पीक विम्यासह सततच्या पावसाचे प्रलंबित अनुदान देखील शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत.