सोयाबीनला फूल ना शेंगा, नुकसान भरपाई देणार कधी ते सांगा
उस्मानाबाद - अतिवृष्टी, गोगलगायींचा हल्ला आणि अळ्यांचा प्रादुर्भाव यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शिवारात हिरवे सोयाबीन दिसत असले तरी त्याला फुले ना शेंगा अशी अवस्था आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी मंडळ अधिकार्यांना सांगून देखील अद्याप पाहणी केलेली नाही. त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी उस्मानाबाद तालुक्यातील सुर्डी येथील शेतकर्यांनी मंगळवार, 06 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून कैफियत मांडली आहे. नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे अशा जोरदार घोषणा देत जिल्हाधिकार्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
सुर्डी शिवारात शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड केली आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा सोयाबीन पिक संकटात सापडले आहे. सुरुवातीलाच अतिवृष्टी आणि गोगलगायींच्या हल्ल्यामुळे पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली. फुले लागण्याच्या अवस्थेतच चार-चारवेळा फवारण्या केल्यानंतरही पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे कोवळ्या शेंगा अळ्यांनी फस्त केल्या आहेत. त्यामुळे सोयाबीन पीक हातून गेल्याची भावना शेतकर्यांमध्ये निर्माण झाली आहे.
महसूलचे कोणीच फिरकले नाही!
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश शासनाने दिलेले असताना अद्याप महसूल प्रशासनातील एकही व्यक्ती सुर्डी शिवारात फिरकलेली नाही. तलाठी, मंडळ अधिकार्यांशी संपर्क साधून नुकसानीची पाहणी करण्याची विनंती केल्यानंतरही कोणी दखल घेण्यास तयार नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार घोषणाबाजी केली. शिवारातील पिकांच्या झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी व पंचनामे करुन तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी या निवेदनात शेतकर्यांनी केली आहे.
पेरणीवरचा खर्च तरी पदरात पडेल का?
उस्मानाबाद तालुक्यातील सुर्डी शिवारातील पिकांप्रमाणेच जिल्ह्यातील अनेक गावातील शेतकर्यांची अवस्था झालेली आहे. अतिवृष्टीमुळे शिवारात पाणी साचल्याने पिकांची वाढ झाली नाही. ज्या शिवारात वाढ झाली तेथे गोगलगायी आणि अळ्यांमुळे सोयाबीनला फुले लागली तरी शेंगा पोखरल्या आहेत. त्यामुळे सोयाबीन लागवडीसाठी केलेला खर्च तरी पदरात पडेल की नाही, याची धास्ती शेतकर्यांना आहे.