टाकळीत व्यायामशाळा सुरू करण्यासाठी सरसावले युवक
पाडोळी - सध्याच्या डिजिटल युगात तरुण मुलांचे मैदानी खेळाकडे आणि लाल मातीच्या कुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. तरुण वर्ग मोबाईलकडे वळून तासनतास मोबाईल गेममध्ये गुंतला आहे. मात्र टाकळी(बेंबळी गावातील काही युवकांनी गावात व्यायामशाळा सुरु करण्यासाठी पुढाकार घेत असून त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. या माध्यमातून लोकवर्गणी गोळा केली जात आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी(बेंबळी) गावची तशी यापूर्वी पैलवानांचे गावं म्हणून ओळख होती. या गावातील नेताजी थोरे, तानाजी थोरे, रफी लातूरे आदी पैलवनांनी महाराष्ट्रभर कुस्तीचे फड गाजविले आहेत. नेताजी आणि तानाजी या जुळ्या थोरे बंधूनी महाराष्ट्र कुस्ती चॅम्पियन स्पर्धेत एक दोन नव्हे तर चार मेडल मिळविले होते.तर पैलवान रफी लातुरे यांनी नॅशनल लेव्हल परत कुस्ती स्पर्धे मध्ये मजल मारली होते.
गावातील व्यायामशाळा बंद असताना देखील स्वतःच्या आणि वडीलांच्या मार्गदर्शनाखाली लहान गटातून गोकुळ सोनटक्के यानेही महाराष्ट्र चॅम्पियन मध्ये सहभाग नोंदवला होता. मात्र गावातील जुनी व्यायामशाळाचे आयुष्यमान संपल्यामुळे ती व्यायामशाळा पंधरा वर्षांपूर्वी पाडण्यात आली. तेव्हापासून गावातील युवकांनी व्यायामाचा छंद जोपासणे आणि मैदानी खेळ सुध्दा बंद केले होते.त्यामुळे येथील युवक हे मोबाईल गेम,व्यसनाच्या आधीन गेले आहेत.
गावात व्यायाम शाळा नसल्यामुळे गावची पैलवांनाचे गावं ही ओळख पुसली गेली,याची गावातील काही नागरिकांना खंत होती, म्हणून उस्मानाबाद जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्याकडे व्यायामशाळे साठी निधी द्यावा म्हणून मागणी केली होती आणि त्याच्या ७ लाख रुपये निधीतून व्यायामशाळाचे बांधकाम पूर्ण ही झाले होते. मात्र ग्रामपंचायतच्या निष्काळजीपणा मुळे व्यायामशाळा धूळखात पडली होती.
याबाबत गावातील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार प्रशांत सोनटक्के, शिवशांत काकडे, नंदकिशोर हजारे, काकासाहेब सोनटक्के अन्य काही युवकांनी धूळखात पडलेली व्यायाम शाळा चालू करावी आणि व्यायामशाळेच्या परिसरातील अतिक्रमण दूर करावे आणि तेथील स्वच्छता करावी म्हणून ग्रामसेवक नेताजी सांगवे आणि उपसरपंच महादेव सूर्यवंशी यांना निवेदन दिले होते. त्याबदल्यात ग्रामपंचायतने दोन दिवसात व्यायामशाळेच्या परिसरातील स्वच्छता ही केली आहे.
आता प्रत्यक्षात व्यायामशाळा सुरू करणेसाठी, व्यायाम शाळेच्या परिसरात सुशोभिकरण करणेसाठी आणि व्यायाम साहित्य खरेदी करण्यासाठी गावातील युवक सोशल मीडियाच्या माध्यमातून वर्गणी जमा करत आहेत. प्रत्यक्षात व्यायामशाळा सुरू करणेसाठी तानाजी थोरे,नेताजी थोरे, गोकुळ सोनटक्के,रियाज शेख, संतोष पांडागळे, सूर्याजी गायकवाड, भास्कर सोनटक्के यांच्या सह अन्य युवक परिश्रम घेत आहेत.