आंतरजिल्हा प्रवासाचे बनावट ई- पास बनवणाऱ्या त्रिकूटाचा पर्दाफाश

 
आंतरजिल्हा प्रवासाचे बनावट ई- पास बनवणाऱ्या त्रिकूटाचा पर्दाफाश

उस्मानाबाद - लॉकडाऊन काळात फक्त पोलीस विभागामार्फतचे ई- पास घेउन आंतरजिल्हा प्रवासास परवानगी आहे. हे ई- पास संबंधीत जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक / आयुक्त कार्यालयामार्फत ऑनलाईन पध्दतीने मंजुर केले जात असुन उस्मानाबाद पोलीस मुख्यालयातील माहिती तंत्रज्ञान कक्षामार्फत सुविधेचे व्यवस्थापन केले जात आहे. या कक्षातील पोलीस नाईक- अमोल निंबाळकर यांना गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, जिल्ह्यात 1,200 ₹ दराने आंतरजिल्हा प्रवासाचे बनावट ई- पास वितरीत होत आहेत. यावर ही हकीकत  पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांना कळवण्यात येउन त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या प्रकरणाचा पर्दाफाश करण्याचे काम हाती घेण्यात आले.

तपासादरम्यान कन्हेरवाडी, ता. कळंब येथील एमएससीआयटी प्रशिक्षण केंद्राचा श्रीकांत शिवाजी कवडे हा बनावट ई- पास प्रत्येकी 1,200 ₹ दराने वितरीत करत असल्याचे पोना अमोल निंबाळकर यांना समजले. यावर माहिती तंत्रज्ञान कक्षातील पोना- अमोल गणेश यांनी दि. 17 मे रोजी बनावट ग्राहक बनून कवडे यास भ्रमणध्वनीवर संपर्क साधुन “मी प्रवासी कार चालक असुन मला पुणे येथे प्रवासी घेउन जायचे असल्याने ई- पास हवा आहे.” अशी बतावणी केली. यावर कवडे याने गणेश यांच्याकडून ओळखपत्र व आवश्यक माहिती व्हाट्सॲपद्वारे घेउन ई- पास पोटी 1,200 ₹ मोबदला युपीआय प्रणालीद्वारे सांगीतलेल्या बँक खात्यात टाकल्यास रात्री 09.00 वा. पर्यंत पास वितरीत होण्याची खात्री दिली. त्यानुसार त्या बँक खात्यात अमोल गणेश यांनी पैसे टाकताच रात्री 09.00 वा. पुर्वीच पोना अमोल गणेश यांच्या व्हाट्सॲपवर तो ई- पास प्राप्त झाला.  

 पोलीस पथकाने त्या पासची तुलना पोलीस दलाच्या अधिकृत पास सोबत केली असता तो ई- पास बनावट असल्याचे समजले. तात्काळ पथकाने कळंब परिसरातून कवडे यास ताब्यात घेतले असता त्याने या पासचे वितरण उस्मानाबाद येथील महादेव दत्तु राजगुरु हा करत असल्याचे सांगताच पथकाने राजगुरु यास ताब्यात घेतले. यावेळी राजगुरु हा या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार असुन सांजा रोड परिसरात राहणाऱ्या विजय भागवत सिरसाटे याच्या मार्फत हे बनावट ई- पास तो बनवून घेत असून कवडे यांच्या मार्फत वितरीत करत असल्याचे निष्पन्न झाल्याने पथकाने त्यासही ताब्यात घेतले.

पोलीस दलाने वितरीत केलेला एक जुना ई- पास (पीडीएफ) मध्ये पीडीएफ एडीटर सॉफ्टवेअरच्या सहायाने बदल करुन त्याजागी नवीन ई- पास धारकाची माहिती भरुन हा बनावट पास सिरसाटे हा तयार करत असे. यावरुन नमूद तीघांना अटक करुन त्यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 420, 468, 471 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 (ड) अंतर्गत गुन्हा कळंब पो.ठा. येथे आज 18 मे रोजी नोंदवला आहे

From around the web