बाधित शेतकर्‍यांची बदनामी - मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रतिमेस शेतकर्‍यांनी हाणले जोडे !

शेतकर्‍यांची माफी मागा - शेतकरी संघर्ष समितीची आक्रमक भूमिका
 
s

धाराशिव- नळदुर्ग-अक्कलकोट महामार्गाचे काम शेतकर्‍यांनी बळाचा वापर करुन बंद पाडल्याचे बाधित शेतकर्‍यांची बदनामी करणारे वक्तव्य विधान परिषदेच्या सभागृहात केल्याप्रकरणी रविवारी (दि.26) नळदुर्ग (ता.तुळजापूर) येथे शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रतिमेस जोडे मारून आंदोलन करण्यात आले. जगाच्या पोशिंद्या शेतकर्‍याचा न्याय्य हक्काच्या मावेजासाठी लढा सुरू असताना नाहक बदनामी करणार्‍या मंत्र्यांनी माफी मागावी अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला.

नळदुर्ग-अक्कलकोट महामार्गाचे काम भूसंपादनातील दिरंगाईमुळे रखडले असल्याचा मुद्दा आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विधान परिषदेत उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काही शेतकर्‍यांनी बळाचा वापर करुन काम बंद पाडले असल्याची माहिती दिली आहे. सदरील माहिती दिशाभूल करणारी असून उलट शेतकर्‍यांवरच अक्कलकोट, उत्तर सोलापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, ही वस्तुस्थिती असताना मंत्री चव्हाण यांनी सभाृगहाला दिलेली माहिती म्हणजे शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. त्यामुळे मंत्री चव्हाण यांनी बाधित शेतकर्‍यांची माफी मागावी अन्यथा त्यांच्याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक दिलीप जोशी यांनी यावेळी दिला.

यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष सरदारसिंग ठाकूर, चंद्रकांत शिंदे यांनीही आपल्या भाषणात प्रशासनाच्या दुटप्पी धोरणाचा निषेध केला. सोलापूर आणि धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंत्र्यांना अशा प्रकारची माहिती दिली गेली होती काय? याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

या आंदोलनात शेतकरी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष सरदारसिंग ठाकूर, समन्वयक दिलीप जोशी, चंद्रकांत शिंदे, बाधित शेतकरी महाळू  हलकंबे, उमेश चव्हाण, गुलाब शिंदे, अब्दुलरहेमान महंमदसाब, विरूपाक्ष माशाळकर, श्रीमंत फडतरे, बाळासाहेब लोंढे-पाटील, दिलीप पाटील, काशीनाथ काळे, शिवराम लोहार, गणपती कलकोटे, शहानवाज शेख, इरण्णा कलशेट्टी, राजेंद्र पवार, दत्तू घोडके, गणपत सुरवसे, महादेव बिराजदार, सुभाष पाटील, शरद पोतदार, रेखा पोतदार, प्रतापसिंग ठाकूर, दशरथसिंग ठाकूर, बंडू मोरे, सैफन मुल्ला, मकबुल मुल्ला, बालाजी ठाकूर, खंडू हलकंबे, तानाजी बनछेडे, पंडित पाटील, लक्ष्मण निकम, प्रशांत शिवगुंडे, व्यंकट पाटील, मानसिंग ठाकूर यांच्यासह तुळजापूर व अक्कलकोट तालुक्यातील बाधित शेतकरी सहभागी झाले होते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
 

From around the web