उस्मानाबादेत  कोरोनाच्या भीतीने तरुणाची आत्महत्या

 
उस्मानाबादेत कोरोनाच्या भीतीने तरुणाची आत्महत्या

उस्मानाबाद : एकीकडे कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना, कोरोनाच्या भीतीने उस्मानाबादेत एका २७ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. सुदर्शन सोमान सिरस ( रा. बामणी ) असे या तरुणाचे नाव आहे. स्टेडियमच्या भिंतीवरुन उडी मारुन त्याने आत्महत्या केल्याचे  मंगळवारी उघडकीस आले. विेशेष म्हणजे या तरुणाची कोरोना चाचणी सोमवारी (दि. १) रात्रीच निगेटिव्ह आली आहे. 

बामणी येथील उच्च शिक्षण घेत असलेला सुदर्शन सोमान सिरस (वय २७) हा तरुण दोन दिवसांपूर्वी पुण्याला गेला होता. तेथून परतल्यानंतर त्याला कोरोना सदृश लक्षणे जाणवू लागल्याने तो जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. तिथे त्याचा स्वॅबही तपासणीसाठी घेण्यात आला होता. दरम्यान, आपल्याला कोरोनाचीच लागण झाली असावी, अशी भीती त्याला होती. शहरातील एका मानसोपचार तज्ज्ञाकडही तो उपचार घेत होता. दरम्यान, सोमवारी रात्री सातच्या सुमारास तो मानसोपचारतज्ज्ञाकडे जायचे आहे, असे सांगून जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना कक्षातून बाहेर पडला. तशी नोंदही कोरोना कक्षात आहे. 

दरम्यान, मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास त्याचा मृतदेह तुळजाभवानी स्टेडियमच्या शॉपिंग कॉम्पलेक्समध्ये आढळला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या दरम्यान डाव्या बाजूच्या व्यापार्‍यांत खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने कोरोनाला घाबरुन आत्महत्या केल्याचा उलगडा झाला, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक मोतीचंद राठोड यांनी दिली. दरम्यान, आत्महत्या केल्याची नोंद आनंदनगर पोलिस ठाण्यात दाखल आहे. 

From around the web