उस्मानाबादेत कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू
उस्मानाबाद - शहरातील गरड हॉस्पिटलमध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये राडा केला. केवळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत शस्त्रक्रिया करणाऱ्या महिला डॉक्टरवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
सांजा चौक भागातील शिल्पा दत्ता डोंगे (२७) या महिलेला एक मुलगा आणि एक मुलगी असून, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी सोमवारी सकाळी शहरातील गरड हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. सायंकाळी ५.३० ला शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर शिल्पा यांना अचानक उलटीचा त्रास सुरू झाला. नर्सने त्यांना एक इंजेक्शन दिल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर काही वेळाने डॉक्टर तेथे आले त्यांनी शिल्पा यांना छातीवर दाब देऊन पंपिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, थोड्या वेळाने रात्री १०.२९ ला त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. तेव्हा नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शिल्पा यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी गोंधळ घातला.
मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
डॉ. अनुराधा गरड यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृत शिल्पा डोंगे यांच्या नातेवाईकांनी घेतली होती. तसेच शवविच्छेदन परजिल्ह्यात करावे, अशी भूमिका घेतली.
नंतर पहाटे तीन वाजता नातेवाईकांनी माघार घेतली. जिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी नातेवाईकांचे जबाब नोंदवले असून याप्रकरणी सध्या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून आनंदनगर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. शवविच्छेदन अहवालावरुन रुग्णालयावर कारवाईचा निर्णय होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आनंदनगर पोलिसांनी जबाब नोंदवून आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे. दरम्यान नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर अखेर मृत शिल्पा डोंगे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
याच हॉस्पिटलमध्ये मागे तुगाव ( ढोकी ) येथील एका महिलेच्या बाळाच्या डोळ्यात सुई अडकली होती. असे प्रकार या हॉस्पिटलमध्ये वारंवार घडत असल्याने लोकांचा विश्वास उडाला आहे.