सदृढ समाज निर्मितीसाठी शिक्षकांचे योगदान महत्वाचे : डॉ.विजयकुमार फड

 
सदृढ समाज निर्मितीसाठी शिक्षकांचे योगदान महत्वाचे : डॉ.विजयकुमार फड

उस्मानाबाद :- शिक्षक हा सदृढ समाज निर्मीतीचा आधारस्तंभ असून शिक्षकांमध्ये सुजाण नागरिक निर्माण करण्याची क्षमता असते, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांनी केले.

       जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये नुकतीच जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आली होती.बैठकीमध्ये लेखा परिच्छेद पूर्तता,अभ्यासक्रम पूर्तता, विद्यार्थी उपस्थिती,व्हर्च्युअल क्लास रुम,खेलो इंडिया उपक्रम, ऑनलाईन स्वाध्याय, ग्रंथालय आणि प्रयोगशाळा सद्यस्थिती, शिष्यवृत्ती परीक्षा,निती आयोग निर्देशांक पूर्तता, निवडश्रेणी प्रस्ताव,एक दिवस शाळेसाठी उपक्रम,सुंदर माझे कार्यालय इत्यादी विषयांचा आढावा घेण्यात आला.

           शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, शासन परिपत्रक दि.10 नोव्हेंबर-2020 अन्वये राज्यातील शाळा सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्याप्रमाणे इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरु झाले आहेत. काही शाळांमध्ये शंभर टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे तर काही शाळांमध्ये ती अत्यल्प आहे. याबाबी तसेच शालेय स्वच्छता, वृक्षारोपण,विद्यार्थ्यांचे आरोग्य, विहित मुदतीत अभ्यासक्रम पूर्ण करणे,अभ्यासक्रमाची उजळणी घेणे,शिक्षकांनी आचरणातून विद्यार्थी घडविणे,तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे, या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करताना डॉ.फड यांनी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची अपेक्षा व्यक्त केली. आपण विद्यार्थ्यांना जे शिकवीत आहोत ते आपणास ज्ञात असले पाहिजे. शिक्षकांनी स्वत: सातत्याने अभ्यासू असले पाहिजे. आपल्या आचार विचारांचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतो, हे लक्षात ठेवले पाहिजे, अशीही अपेक्षा डॉ.फड यांनी यावेळी व्यक्त केली.

        शाळेच्या वेळेत शिक्षकांनी शाळेत राहणे,विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असली तरीही पूर्णवेळ अध्यापन करणे, विद्यार्थ्यांकडून कृतिशील उपक्रम करणे, शिक्षकांनी अंतर्गत समन्वय ठेवणे, किमान त्यांच्याशी संबंधित विषयाचा सखोल अभ्यास करणे अपेक्षित असल्याचे सांगून काही शिक्षकांनी केलेल्या स्तुत्य उपक्रमाचा,कार्याचा गौरवही बैठकीमध्ये केला. यावेळी प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉ.अ.भा.मोहरे यांचीही उपस्थिती होती.

From around the web