कोव्हीडचे नियम पायदळी तुडवत तहसीलदार गणेश माळी यांचा शासकीय कार्यालयात वाढदिवस साजरा
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवा, मास्क वापरा, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी अनेकवेळा केले आहे.मात्र या आवाहनाला हरताळ फासण्याचे काम उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी यांनी केले आहे.
तहसीलदार गणेश माळी यांचा ३ मार्च रोजी वाढदिवस होता, या वाढदिवसादिवशी पाचपेक्षा अधिक लोक तहसील कार्यालयात जमा होऊन तहसीलदार गणेश माळी यांचा वाढदिवस साजरा केला.संतापाची बाब म्हणजे यावेळी माळी यांनी मास्क घातलेला नव्हता, तसेच उपस्थित लोकांपैकी अनेकांनी मास्क घातलेला नव्हता, तसेच सुरक्षित अंतर ठेवण्यात आले नव्हते.
तहसीलदार माळी यांनी कोव्हीड -१९ चे सर्व नियम पायदळी तुडवत आपला वाढदिवस तेही शासकीय कार्यालयात साजरा केला असून, त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी अभिजित पतंगे यांनी उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
एकीकडे दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना कोरोनाची बाधा झाल्याने ते होम क्वारंटाइन आहेत. त्यापासून बोध घेण्याऐवजी तहसीलदार गणेश माळी हे कोव्हीडचे नियम पायदळी तुडवत आहेत.