चिकन, मटण व अंडी विक्रीची दुकाने बंद !

रोग प्रतिकार शक्ती वाढणार कशी ?
 
चिकन, मटण व अंडी विक्रीची दुकाने बंद !

उस्मानाबाद -  कोरोना विषाणूंच्या महामारीचा वाढणारा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. मात्र या लॉकडाऊनमध्ये मांस विक्री करणारी चिकन, मटण व अंडे विक्रीची दुकाने बंद असल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे एकीकडे मांसाहार न करता रोगप्रतिकारक शक्ती तयार होणार कशी ? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जाऊ लागला आहे. तर दुसरीकडे दुकानदारा मध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे ते देखील परेशान व अस्वस्थ आहेत.

कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्या दुकानांना परवानगी दिली आहे. मात्र शासनाने काढलेल्या अध्यादेशामध्ये चिकन, मटण व अंडी विक्री करणाऱ्या दुकान व दुकानदाराबाबत कोणताही नामोल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे यांना परवानगी देण्यात आली आहे किंवा नाकारली आहे हे स्पष्ट होत नाही. जर त्यांच्याबाबत अध्यादेशामध्ये कुठलाही उल्लेखच नसेल आणि त्यांनी आपली दुकाने उघडली. जिल्हा प्रशासनाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली तर त्याचा नाहक भुर्दंड या दुकानदारांना सोसावा लागणार आहे. त्यामुळे सर्वच दुकानदार संभ्रमात पडले असून त्यांनी आज रोजी दिवसभर एक ही दुकान उघडले नव्हते. मात्र मांसाहार करणाऱ्या व्यक्तींनी चिकन मटण व अंडी खरेदी करण्यासाठी या दुकानाकडे दिवसभर हेलपाटे मारल्याचे दिसून आले.

जिल्हा प्रशासनाची भूमिका महत्त्वाची 

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने मांसाहार करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. परंतु मांसाहार विक्री करणारे दुकानांना दुकाने उघडण्याबाबत संदिग्ध भूमिका शासनाने घेतली आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाने देखील काही निर्णय जिल्हा प्रशासनाने परिस्थिती पाहून घ्यावेत असे स्पष्ट केले असल्यामुळे जिल्हाधिकार्‍यांना याबाबत योग्य निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे जिल्हावासियांमध्ये वाढत असलेला असंतोष कमी करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी तात्काळ या बाबत निर्णय घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक ठरणार आहे.

From around the web