धक्कादायक : पत्रकार विजय बेदमुथा यांचे हैद्राबाद येथे कोरोनाने निधन 

आठच दिवसात पत्रकार बेदमुथा बंधू काळाच्या पडद्याआड 
 
धक्कादायक : पत्रकार विजय बेदमुथा यांचे हैद्राबाद येथे कोरोनाने निधन

उस्मानाबाद - उस्मानाबाद येथील ज्येष्ठ पत्रकार विजय बेदमुथा ( वय ६७ ) यांचे हैद्राबाद  येथे कोरोनाने निधन झाले. आठच  दिवसापूर्वी त्यांचे मोठे बंधू  पत्रकार मोतीचंद बेदमुथा ( वय ६९ ) यांचे कोरोनाने निधन झाले होते. 


 पंधरा दिवसापूर्वी पत्रकार विजय बेदमुथा आणि त्यांचे बंधू मोतीचंद बेदमुथा यांना  एकाच वेळी कोरोनाची लागण  झाली होती, दोन्ही बंधूंवर हैद्राबाद  येथे उपचार सुरु होते. मोतीचंद बेदमुथा यांचे २२ एप्रिल रोजी निधन झाले तर विजय बेदमुथा यांचे आज ३० एप्रिल रोजी सकाळी  निधन झाले. केवळ आठच दिवसात दोन पत्रकार बंधूंचे निधन झाल्याने उस्मानाबादेत हळहळ व्यक्त केली जात आहे. 


दिवंगत पत्रकार विजय बेदमुथा जवळपास २० ते २५ वर्षे लोकमतमध्ये उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. दहा वर्षांपूर्वी लोकमतमधून निवृत्ती घेतल्यानंतर ते विविध सामाजिक कार्यात अग्रेसर  होते. भारतीय जैन समाजाचे पहिले  उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष  म्हणून त्यांनी कार्य केले होते. 

तसेच त्यांचे मोठे बंधू मोतीचंद बेदमुथा हे महाराष्ट्र टाइम्समध्ये अनेक वर्षे बातमीदार म्हणून काम केले होते. उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणूनही  त्यांनी दोन वर्षे जबाबदारी पार पाडली होती.  

राजेंद्र दर्डा यांच्याकडून भावना व्यक्त 

हे धक्के कसे सहन करायचे ! उसने अवसान किती दिवस आणायचे ! विजय कुमार बेदमुथा यांच्या जाण्याचा धक्का हा विकल करणारा. धडाडीचा  पत्रकार, यशस्वी व्यावसायिक, सामाजिक बांधिलकी मानणारा, कुटुंब वत्सल असं हे व्यक्तिमत्त्व . अनेक वर्षे ते उस्मानाबाद लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी होते . त्या काळात लातूर आणि उस्मानाबाद जिल्हे त्यांच्या सोबत पिंजून काढले होते .  किल्लारीच्या भूकंपानंतर  हा भूकंपग्रस्त परिसर आम्ही दोघांनी अक्षरशः पालथा घालून मदत पोहोचविली. लोकमत सोलापूर आवृत्तीच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान होते.गेल्याच आठवड्यात त्यांचे बंधू मोतीचंद जी गेले, पाठोपाठ आज विजय कुमारजी . परिस्थिती समोर आपण किती हतबल आहोत हे वारंवार जाणवत राहतं.

- राजेंद्र दर्डा, लोकमत समूह संपादक 

From around the web