उस्मानाबाद शहरात टवाळखोरांची केली जातेय रॅपिड तपासणी
उस्मानाबाद - - कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे जिल्ह्यात २१ एप्रिलपासून सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र अकरा वाजल्यानंतर अनेकजण विनाकारण रस्त्यावर फिरून गर्दी करीत असल्यामुळे त्यांना चाप लावण्यासाठी पोलीस, महसूल, नगर प्रशासन यांचे संयुक्त पथक तैनात करण्यात आले आहे. हे पथक चौकाचौकात अशा टवाळखोरांना अडवून त्यांची रॅपिड टेस्ट करण्यासह दंडात्मक कारवाई करीत आहे.
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसिलदार गणेश माळी, मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्ती, दुचाकी व चार चाकी वाहनधारकांना तसेच चालकांना देखील काढून ते कोणत्या कामासाठी बाहेर फिरतात ? याची विचारणा केली जात आहे. खातरजमा झाल्यानंतर व योग्य कारण असेल तरच त्या व्यक्तीस सोडून दिले जाते तर विनाकारण फिरत असलेल्या व्यक्तींची चौकातच रॅपिड अॅन्टिजेन तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीत एखादा फिरस्ती पॉझिटिव्ह निघाला तर त्यास ॲम्बुलन्समध्ये बसवून त्याची थेट रवानगी जिल्हा शासकीय रुग्णालयात केली जात आहे.
या चौकात ९३ जणांची तपासणी करण्यात आली त्यापैकी सहा जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले करुणा पॉझिटिव्ह निघालेल्या सर्व रुग्णांना येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात ॲम्बुलन्सद्वारे दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत.