उस्मानाबादेत विवाहित बलात्कार करणारा पोलीस कर्मचारी निलंबित
उस्मानाबाद - शहरातील बार्शी नाका परिसरात राहणाऱ्या एका ३२ वर्षीय विवाहित महिलेने 2 मार्च रोजी सायंकाळी गळफास घेवून आत्महत्या केली होती.सुसाईड नोटमध्ये पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी हरीभाऊ भास्कर कोळेकर याने बंदुकीचा धाक दाखवून वारंवार बलात्कार केल्याचे नमूद केले होते. यावरुन संबंधीत पोलीसाविरुध्द भा.दं.सं. कलम- 376, 306, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. या पोलीस कर्मचाऱ्यास बलात्कार आणि आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आली असून, त्यास पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे.
उस्मानाबाद येथील पोलिस मुख्यालयात कार्यरत असणाऱया हरीभाऊ भास्कर कोळेकर याने बंदुकीचा धाक दाखवून वारंवार बलात्कार केल्याची चिठ्ठी लिहून या विवाहित महिलेने आरोपीच्या बार्शी नाका परिसरातील हनुमान चौक येथे असणाऱया बांधकामावर 2 मार्च रोजी सायंकाळी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली होती. त्यानंतर सदरील महिलेच्या पतीनेही येथील शहर पोलिस ठाण्यात संबंधित पोलिस कोळेकर याच्या विरुध्द फिर्याद दाखल केली होती. यावरुन संबंधीत पोलीसाविरुध्द भा.दं.सं. कलम- 376, 306, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.यानंतर 3 मार्च रोजी सकाळी या पोलिसास अटक करण्यात आली होती.
जिल्हा पोलिस अधिक्षक राज तिलक रौशन यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणातील आरोपी पोलिस हरीभाऊ भास्कर कोळेकर यास सेवेतून निलंबीत केले आहे. तसेच या प्रकरणी त्याची विभागीय चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मोतीराम राठोड हे करीत आहेत.