आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी घेतला तेरचा आढावा

 
प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिला कृती कार्यक्रम

आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी घेतला तेरचा आढावा


उस्मानाबाद - जिल्ह्यात शहरांबरोबर ग्रामीण भागातही कोरोना विषाणू संसर्ग वाढत आहे.मागील काही दिवसात उस्मानाबाद, उमरगा, तुळजापूर, कळंब शहरात असलेला रुग्णवाढीचा वेग आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पसरत चालल्याचे दिसत आहे. उस्मानाबाद तालुक्यातील तेर गावात १२ दिवसात कोरोनाचे १०० रुग्ण झाले आहेत.त्यामुळे २६ तारखेपर्यंत जनता कर्फ्यु लागू करण्यात आला आहे.

तेर मधील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. अनलॉकमुळे अनेक लोक घराबाहेर पडत आहेत. अनेक लोक मास्कशिवाय घराबाहेर पडत असून सोशल डिस्टन्सिंगचंही पालन करत नाहीत. शिवाय इतर नियमांकडेही कानाडोळा केला जात आहे. त्यामुळे संसर्ग होऊन करोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी तेर साठी विशेष नियोजन करून एक कृति कार्यक्रम तयार केला आहे.

गावात साधारणतः ३००० कुटुंब असून आ.पाटील यांनी गावातील प्रमुख नेत्यांसह,ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना एकूण २० टीम करण्याच्या सूचना दिल्या होत्या व प्रत्येक टीम ला एक जबाबदार व्यक्ती प्रमुख म्हणून नेमण्यात आले आहेत.एका टीमला प्रत्येकी १५० कुटुंब याप्रमाणे विभागणी केली आहे.

गेली तीन दिवसांपासून याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.यात सर्व टीमच्या सदस्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील १५० कुटुंबाची वारंवार घरोघरी जाऊन रुग्णांचा सर्व्हे करून त्यांची तपासणी करने,जर एखादा व्यक्ती संशयीत अथवा आजारी असेल तर त्यावर तातडीने उपचार करून त्याचे विलगिकरण देखील करणे अपेक्षित आहे.२६ तारखे पर्यंत जनता कर्फ्यु असल्याने सदर टीम त्यांच्याकडे असलेल्या सर्व कुटुंबावर करडी नजर ठेवून असणार आहेत व  अनावश्यक कोण घराबाहेर पडत असेल तर त्याला तिथेच पायबंद घालण्यात येणार आहे.मास्क न घालता कोणालाही घराबाहेर पडू दिले जाणार नाही व विना मास्क कोण निदर्शनास आले तर त्याला तिथेच रोखून  व दंड लावण्यात येणार आहे.

आज आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी तेर येथे भेट देऊन जे नियोजन केले आहे त्याची अंमलबजावणी योग्य पध्दतीने होते की नाही याचा आढावा घेतला व ज्या उणिवा नजरेला आल्या त्या दूर करून याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी व्हावी,त्यात सातत्य रहावे यासाठी सर्व यंत्रणा व २० टीमच्या प्रमुखांसह सर्व सदस्यांना सूचना दिल्या.याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी त्यांनी उपजिल्हाधिकारी यांना याकडे खास लक्ष ठेवण्याबाबत सांगीतले असून उपविभागीय पोलीस अधिकारी कळंब यांना देखील तेरला भेट देऊन याबाबत आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यावेळी त्यांच्या समवेत जि.प. अध्यक्षा सौ.अस्मिता कांबळे, जि.प. बांधकाम सभापती श्री.दत्तात्रय देवळकर, पंचायत समितीचे उपसभापती श्री.संजयकाका लोखंडे, उप विभागीय अधिकारी श्री.रोडगे, तहसिलदार श्री.माळी, गटविकास अधिकारी श्रीमती दिवाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री.वडगांवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.बनसोडे, आशा कार्यकर्त्या, सर्व ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी कार्यकर्त्या उपस्थीत होत्या."गेली तीन दिवसांपासून हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली असून २० टीम व त्यांच्याकडे १५० कुटुंब अशी विभागणी केल्याने,कामाची विभागणी व प्रत्येकाची जबाबदारी निश्चित झाली असून संसर्गाची साखळी तोडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्याचा  उपयोग होईल.जिल्ह्यात ग्रामीण भागात वाढता प्रादुर्भाव पाहता बाधित गावांनी परिस्थितीनुसार या पद्धतीने नियोजन केल्यास वाढता प्रादुर्भाव रोखण्यास याचा निश्चित मदत होईल."

-आ.राणाजगजीतसिंह पाटील

From around the web