उस्मानाबादचे नामांतर धाराशिव नव्हे नागेशनगरी करावे... 

बौध्द समाज बांधवांनी पुरातन ऐतिहासाचा दाखले देत केली मुख्यमंत्र्याकडे मागणी 
 
उस्मानाबादचे नामांतर धाराशिव नव्हे नागेशनगरी करावे...

उस्मानाबाद - उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्याची मागणी भाजपने केल्यानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता उस्मानाबादचे नामांतर धाराशिव नव्हे नागेशनगरी करण्याची मागणी काही बौध्द समाज बांधवांनी केलेली आहे. त्यामुळे उस्मानाबाद नामांतराबाबत वाद  निर्माण होण्याची शक्यता आहे.  


 उस्मानाबाद येथील बौध्द समाज बांधवांनी  पुरातन ऐतिहासाचा दाखले देत उस्मानाबादचे नाव नागेशनगरी करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,  वास्तविक पाहता उस्मानाबादचा प्राचीन इतिहास पुढील प्रमाणे असून तो उस्मानाबादचे नामकरण नागेशनगरी करण्यासाठी पुरेसा आहे. मागच्या दिड हजार वर्षाखाली भारतच नव्हे तर सबंध जंबुद्वीप बौध्दमयी होता. याच जम्बुद्विपात ९०० वर्ष बुद्ध विचाराचे नितिमत्ता युक्त एकछत्री शासन होते. याची आपणास ही माहिती आहे. त्यामुळे याच जम्बुद्विपात अर्थात भारतातील महाराष्ट्रात येणाऱ्या अनेक जिल्ह्यांपैकी उस्मानाबाद जिल्हा होय. 

प्राचीन काळामध्ये याच उस्मानाबाद च्या भूमीत नाग वंशीय लोकांची राजवट होती व त्यांचा धर्म हा बौद्धधर्म हा होता. याची साक्ष आज रोजी देखील तेर, गडदेवदरी, तीर्थ (बु), चिवरी येथील लेणी इत्यादी ठिकाणाहून मिळते. तसेच जागतिक प्रवासी ह्युनसॅंग व फहियान यांनी आपल्या प्राचीन लेखनात या उस्मानाबाद जिल्ह्यातील भूमीवर प्राचीन बौध्द धम्मीय साम्राज्यातील बौद्धांच्या प्रचंड मोठ्या अस्तित्वाची साक्ष लिहून ठेवलेली आहे. ती आज देखील आपणास विविध ग्रंथांच्या माध्यमातून वाचावयास मिळते. 

त्यामुळे या मातीतील बौद्ध साहित्य, प्रतिके व स्मारके इत्यादी बौध्द साम्राज्याची साक्ष असणार्‍या बाबींशी बौध्द समाजाच्या भावना जुडलेल्या असून आमच्या भावनांची अवहेलना होऊ नये. यासाठी विनंती करण्यात आली असून उस्मानाबादचे नामकरण नागेश नगरी असे करण्यात यावे अशी आग्रही मागणी केली आहे. यावर विजय अशोक बनसोडे, संग्राम बनसोडे, अॅड. शांतीबल कांबळे, सामाजिक कार्यकर्ते कानिफनाथ देवकुळे, आरपीआयचे जिल्हा संघटक सोमनाथ गायकवाड, मुकेश मोटे, अमोल अंकुश, बाबासाहेब कांबळे, महादेव एडके यांच्या सह्या आहेत.

From around the web