पोलीस निरीक्षक दगुभाई शेख यांना ‘उल्लेखनिय सेवेचे राष्ट्रपतींचे पोलीस पदक’ जाहीर
Aug 14, 2020, 18:34 IST
उस्मानाबाद - उस्मानाबाद पोलीस मुख्यालयाच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दगुभाई शेख यांना ‘उल्लेखनिय सेवेचे राष्ट्रपतींचे पोलीस पदक’ जाहीर झाले आहे. याबद्दल पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी शेख यांचे अभिनंदन केले.
पोलीस खात्यात निरंतर उल्लेखनिय कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांस प्रतिवर्षी राष्ट्रपतींचे पोलीस पदक दिले जाते. सन- 2020 या वर्षातील पदक प्राप्तकर्त्यांची यादी नुकतीच जाहीर झाली. यात स्थानिक गुन्हे शाखा, उस्मानाबादचे पोलीस निरीक्षक श्री. दगुभाई मुहंमद शेख यांचा समावेश आहे.
दगुभाई शेख, रा. तिरकवाडी, ता. फलटण, जि. सातारा हे सन- 1983 मध्ये पोलीस खात्यात रुजू झाले असुन सातारा, रायगड, रत्नागिरी, ठाणे शहर, नागपूर शहर यांसह महामार्ग सुरक्षा पथक व राज्य गुप्तवार्ता विभागात त्यांनी कर्तव्य बजावले आहे. सन- 2014 पासुन ते उस्मानाबाद जिल्ह्यात नेमणुकीस आहेत. पोलीस खात्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना आजपर्यंत 450 हुन अधीक बक्षीसे- प्रशस्तीपत्रे मिळाली असुन सन-2014 साली ‘पोलीस महासंचालकांचे मानचिन्ह’ प्राप्त झाले आहे.
दगुभाई शेख यांचे अभिनंदन करताना पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन ... |
त्यांना मिळालेल्या या पोलीस पदकाबद्दल औरंगाबाद विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक, रविंद्र सिंघल, . पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, अपर पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांसह जिल्हा पोलीस दलातील अधिकारी- कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.