उस्मानाबाद नगर पालिका : सभापती निवडणुकीत महाविकास आघाडीची बाजी
उस्मानाबाद - उस्मानाबाद नगर पालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची गुरुवारी निवड झाली. या निवडीच्या वेळी महाविकास आघाडीने बाजी मारली. शिवसेनेने भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी आघाडी केली .
उस्मानाबाद नगर पालिकेत एकूण ३९ नगरसेवक निवडून आले आहेत. पैकी राष्ट्रवादीचे माणिक बनसोडे यांचे निधन झाल्याने संख्याबळ ३८ झाले आहे. त्यात शिवसेनेचे - ११ , भाजपचे - १५ ( मूळ भाजपचे ८ आणि आ. राणा पाटील समर्थक ७ ) , राष्ट्रवादी - ९ , काँग्रेस - २ , अपक्ष - १ असे पक्षीय बलाबल आहे. नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर हे शिवसेनेचे असून थेट जनतेतून निवडून आले आहेत.
पालिकेत महाविकास आघाडीचा ‘फाॅर्म्युला’
यापूर्वी उस्मानाबाद नगर पालिकेत शिवसेना आणि भाजपची युती होती. राज्यात महाविकास आघाडी सत्तारूढ झाल्यामुळे उस्मानाबाद नगर पालिकेतही शिवसेनेने भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर आघाडी केली आहे. यावेळी पालिकेत महाविकास आघाडीचा ‘फाॅर्म्युला’ राबवण्यात आला.
आज झालेल्या विविध विषय समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे तीन, राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांची निवड झाली.
आरोग्य व स्वछता समिती सभापती - राणा बनसोडे ( शिवसेना )
शिक्षण सभापती - सिद्धेश्वर कोळी ( शिवसेना )
महिला व बालकल्याण सभापती - सोनाली वाघमारे ( शिवसेना ) , उपसभापती - विद्या एडके ( काँग्रेस)
सार्वजनिक बांधकाम सभापती - प्रदीप घोणे ( राष्ट्रवादी )
पाणी पुरवठा सभापती - बाबा मुजावर ( राष्ट्रवादी )
तर स्थायी समिती सदस्यपदी सिद्धार्थ बनसोडे ( काँग्रेस ) खलिफा कुरेशी ( राष्ट्रवादी ) शिवाजी पंगुडवाले ( भाजप ) यांची निवड झाली.
शिवसेनेच्या गुरव यांची माघार
स्थायी समितीसाठी शिवसेनेकडून गटनेता सोमनाथ गुरव, राष्ट्रवादी कडून खलिफा कुरेशी व काँग्रेसचे सिद्धांत बनसोडे तर भाजपकडून पंगुडवाले यांचे नाव सुचवले. परंतु राष्ट्रवादीकडून एकाच सदस्याची निवड होऊ शकत असल्याने सिद्धांत बनसोडे हे समितीतून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली. परंतु, महाविकास आघाडीचा फाॅर्म्युला पाळत शिवसेनेचे सोमनाथ गुरव यांनी माघार घेत काँग्रेसचे बनसोडे यांना सेनेच्या गटातून स्थायी समितीत पाठविण्यात आले.