आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत होत असलेल्या कामात अनियमितता
Sat, 8 Aug 2020
शिवसेनेचे उपशहर प्रमुख प्रशांत बापू साळुंके यांचा 'घरचा आहेर'
उस्मानाबाद नगर परिषदेचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर हे शिवसेनेचे असून, प्रशांत बापू साळुंके यांनी नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभा करून घरचा आहेर दिला आहे.
साळुंके यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, उस्मानाबाद शहरात आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत होत असलेल्या कामाची निविदा आधी काढून नंतर प्रशासकीय मान्यता घेण्यात आली आहे. तसेच ज्या भागात अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विशेष घटकातील एकही नागरिकाचे घर नाही, अश्या ठिकाणी या योजनेतून काम करण्यात येत आहे. यासाठी तत्कालीन मुख्याधिकाऱ्यानी समाजकल्याणच्या सहाय्यक आयुक्तांचे स्थळ पाहणी अहवालही घेतलेला नाही. शिवाय या योजनेतील कामे अंदाजपत्रकाप्रमाणे होत नसल्याची तक्रार साळुंके यांनी विभागीय आयुक्ताकडे केली होती.
याअनुषंगाने या संपूर्ण प्रकारणाची चौकशी करून १५ दिवसात अहवाल देण्याचे निर्देश नगर परिषद प्रशासन विभागाचे प्रादेशिक उपसंचालक अॅलिस पोरे ( विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद ) यांनी जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांना दिले आहेत.