उस्मानाबाद येथे शासकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालय उभारणीला तत्वतः मान्यता
Aug 27, 2020, 19:27 IST
मुंबई - उस्मानाबाद येथे शासकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालय उभारणीला तत्वतः मान्यता देण्यात आली असून, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने तातडीने पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले आहे.
गुरुवार दि. २६ ऑगस्ट रोजी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह उस्मानाबाद येथे नव्याने उभारावयाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयाच्या संदर्भाने आढावा बैठक झाली. या बैठकीस पर्यावरण तथा राज्य शिष्टाचार मंत्री ना. आदित्य ठाकरे, उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील आदी उपस्थित होते
उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत गुरूवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक घेण्यात आली हे महाविदयालय सुरू करण्याच्या दृष्टीने सर्वेष चर्चा झाली. या संदर्भातील कार्यवाहीचा आढावा घेणेत येऊन वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत तत्वतः मान्यता देण्यात आली. आता यापूढील कार्यवाही वैदयकीय शिक्षण विभागाने तातडीने पुर्ण करावी अशा सुचना वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री ना. अमित विलासराव देशमुखयांनी संबंधितांना यावेळी दिल्या आहेत.
या बैठकीच्या दरम्यानच उस्मानाबाद जिल्हयातील कोवीड १९ प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी शासना मार्फत करण्यात येत असलेल्या उपाय योजनांचा आढावाही घेण्यात आला. सध्या कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद येथे वैद्यकीय अधिकारी आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांची कमतरता जाणवत आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी जिल्ह्यातील सामान्य जनता आणि रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अन्य जिल्ह्यातून तात्पुरत्या स्वरूपात उधार उसनवार तत्वावर ते उपलब्ध करून देण्याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांना निर्देश देण्यात आले आहेत.