17 मे पर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवा सुरु करण्यास मनाई

 
17 मे पर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवा सुरु करण्यास मनाई


            उस्मानाबाद:   महाराष्ट्र शासनाने कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा कालावधी दि. 17 मे, 2020 पर्यंत वाढविला आहे व लॉकडाऊनच्या कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. यामध्ये ग्रीन झोन मध्ये बसमधील बैठक व्यवस्थेच्या 50 टक्के इतक्या क्षमतेने बस सुरु करणेस परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच बसेसद्वारे फक्त ग्रीन झोनमध्येच प्रवासी वाहतुक करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.

            कोरोना विषाणू (COVID-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळणे, वैदयकीय निकषानुसार निश्चित केलेले सामाजिक अंतराचे पालन करणे आवश्यक आहे.
           सद्यस्थितीत उस्मानाबाद जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये असून उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमांलगत असलेले जिल्हे हे रेड व ऑरेज झोनमध्ये आहेत. त्यामुळे जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सुरु केल्यास या बसेस फक्त उस्मानाबाद जिल्ह्यातच प्रवाशांची वाहतूक करु शकतील.

         तसेच बसेस सुरु केल्यामुळे जिल्हयातील बस स्थानकांवर फार मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे कोरोना विषाणू (COVID-19) चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून सद्यस्थितीत दि. 17 मे 2020 पर्यंत लॉकडाऊनचे कालावधीत उस्मानाबाद जिल्हांतर्गत राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची वाहतुक सुरु करणे आवश्यक नसल्याची खात्री झाली आहे.

          त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांनी त्यांना प्राप्त अधिकारांनुसार कोरोना विषाणू (COVID-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या कालावधीत उस्मानाबाद जिल्हांतर्गत राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा सुरु करण्यास मनाई केली आहे .
          या आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून तात्काळ लागू करण्यात येत आहे.

From around the web